संकटांशी संघर्ष करणारे गोळेगाव

जीवनाचा अविभाज्य घटक असलेले ‘पाणी’. पाणी हा फक्त एक शब्द नाही, तर माणसाचं संपूर्ण जीवन व्यापून टाकणारा घटक आहे. युनोस्कोतर्फे २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर हा कालावधी जागतिक जल सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त हे लेख.

‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१७’ स्पर्धेतील आघाडीच्या बारा गावांपैकी एक आणि खुलताबाद तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या गोळेगावने प्रयत्नांची शर्थ करून स्वतःबरोबरच पाण्याचे अस्तित्व निर्माण केले. गोळेगावच्या परिस्थितीचा हा आढावा…

निसर्गरम्य वातावरणात आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या औरंगाबादमधील गोळेगाव! भ्रष्टाचारमुक्त गाव, चांगले रस्ते, तंटामुक्त गाव अशी त्याची ख्याती. मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे त्यांचं सगळं जीवनमान विस्कळीत झालं होतं. पाण्यासाठी गावकऱयांचा सततचा झगडा. पाण्याची समस्या या गावात अत्यंत बिकट होती. जानेवारी ते जुलैदरम्यान गावात टँकरशिवाय पर्याय नाही.

गावात स्वतःच्या हक्काचा एक डोंगर आहे. मात्र पिढ्यान्पिढ्यांच्या चुकांमुळे तोही बोडका झालेला. डोंगरावरील सगळी माती वाहून गेल्यामुळे डोंगराचा ‘काळा छापा’ झाला आहे. ‘काळा छापा’ म्हणजेच डोंगरावरचा पूर्णपणे उघडा पडलेला खडक. अशा या अतिशय भयानक परिस्थितीची जाणीव झाल्यावर असं इतर डोंगरांचं होऊ नये यासाठी गोळेगावकरांनी या डोंगरावर पाणलोट उपचार करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांना योग्य ज्ञान आणि दिशा मिळत नव्हती. मात्र ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१७’ स्पर्धेची घोषणा झाली आणि गावाने आपला सहभाग नोंदवला. गावकरी स्पर्धेविषयी प्रचंड उत्सुक होते, पण ही उत्सुकता काही कारणांमुळे दीर्घकाळ राहिली नाही.

याच काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. सगळय़ांचे लक्ष निवडणुकीकडे लागल्यामुळे जलसंधारणाच्या कामाचे नियोजन रखडले. प्रत्येक गोष्ट संथगतीने होऊ लागली. त्यातच स्पर्धेच्या प्रशिक्षणाची तारीख जवळ आली होती. जे प्रशिक्षणार्थी निवडले गेले होते त्या पाचपैकी चारजणांनी माघार घेतली. एक संकट संपत नाही तोच दुसरे समोर उभे अशी परिस्थिती निर्माण झाली. ग्रामसभेने नवीन पाचजणांची निवड करून वाजतगाजत त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवले. स्वतःमध्ये झालेला सकारात्मक वैचारिक बदल आणि जलसंधारणाच्या कामाविषयी निर्माण झालेली आत्मीयता आणि आस्था घेऊन प्रशिक्षणार्थी गावी परतले.

निवडणुका संपल्या आणि लोकांचे पुन्हा एकदा स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मोठय़ा संख्येने लोकांनी उत्साहात आणि जोशात श्रमदानाची सुरुवात केली. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळय़ा जिह्यांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या ६५० मुलांनी गोळेगाव येथे श्रमदान केले. ‘‘जी वेळ आमच्यावर आली ती इतर कुणावरही येऊ नये’’– या भावनेतून या लहान मुलांनी श्रमदान केले. उर्वरित ४३ दिवसांसाठी ही मुले गावकऱयांना ऊर्जा देऊन गेली. रोज जोमात श्रमदान होऊ लागले. तंत्रशुद्ध पद्धतीने काम करण्याची काळजी घेतली जाऊ लागली. इतर गावकऱयांबरोबर आबालवृद्धदेखील श्रमदानात सहभागी झाले. एक वेगळेच वातावरण गावात तयार झाले होते. सगळं काही सुरळीत होतंय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा गावासमोर संकट उभं राहिलं.

झालं असं की, ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे काही दिवसांतच कामाचा उत्साह आणि लोकांचा प्रतिसाद मंदावला. जिथे रोज ५०० ते ७०० लोक श्रमदान करायचे तिथे ही संख्या १५० ते २०० वर आली. त्यातच गावातील क्रियाशील असलेल्या ७१ मुली आणि ८ महिला ‘विराट कन्या कौशल्य’ शिबिरासाठी शिर्डी येथे गेल्या, ज्याचा खूप जास्त परिणाम श्रमदानावर झाला. लोकांचा एकूणच याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी गावाचे सरपंच संतोष जोशी पुढे आले.

२००५ पासून गोळेगावचे सरपंच असलेले संतोष जोशी यांचं गावाच्या विकासात खूप मोठं योगदान आहे. २०१० ते २०१५च्या दरम्यान ते उपसरपंच होते आणि २०१६ पासून परत सरपंचपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. या सगळय़ा कार्यकाळात ते आजपर्यंत एकदाही सरपंचाच्या खुर्चीवर बसलेले नाही.

यामागचे कारण सांगताना जोशी सांगतात की, ‘‘गावाच्या विकासाविषयी आणि गावाच्या हिताच्या दृष्टीने ज्यांची इच्छा चांगली आहे, ती प्रत्येक व्यक्ती गावचा सरपंच आहे. मी फक्त त्यांचे प्रतिनिधित्व करतो आहे. सगळय़ांची पावलं एका दिशेने जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यात कुठेही प्रदूषितपणा नको, तरच ते कार्य टिकेल.’’ आणि म्हणूनच गावाला एकत्र आणण्यासाठी एक वेळेस जेवण न करण्याचा निर्णय सरपंचांनी घेतला. याचा सकारात्मक परिणाम लोकांवर झाला. त्यादरम्यान शिबिराहून परत आलेल्या मुलींनीही गावातल्या प्रत्येक घरी, प्रत्येक चौकात, प्रत्येक पारावर जाऊन लोकांना श्रमदानाला येण्याची विनवणी केली. त्यांच्या या प्रयत्नांना प्रतिसाद देत पुन्हा एकदा श्रमदान जोरात सुरू झाले.

संकटांची पोलादी साखळी आपल्या हिमतीवर तोडत गोळेगावने अवघड गोष्ट सहज केली. एखादी चांगली गोष्ट घडायची असेल तर तिची सुरुवात होणं गरजेचं असतं. संकटांवर मात करत गोळेगावने मोठं काम केलं असलं तरी, ‘‘ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि आम्ही तो गाठणारच’’ असं गोळेगावचे रहिवासी अभिमानाने सांगतात.

सौजन्य : पाणी फाउंडेशन

www.paanifoundation.in/