#WorldCup2019 पंतला डावलून कार्तिकला संधी, नेटिझन्समधून आश्चर्याचा सूर


सामना ऑनलाईन । मुंबई

इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघाची सोमवारी घोषणा करण्यात आली. निवड समितीने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. विराट कोहलीच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असूनर रोहित शर्मा उपकर्णधार असेल. निवड समितीने सर्वोत्तम संघ निवडला असला तरी ऋषभ पंतचा समावेश न झाल्याने नेटिझन्स आणि क्रिकेट पंडितांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

विश्वचषकासाठी हिंदुस्थानचा संघ जाहीर; जाडेजा, राहुल, कार्तिकला संधी

सोमवारी घोषित करण्यात आलेल्या संघामध्ये महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून दिनेश कार्तिकचा संघात समावेश करण्यात आला आहे. तरुण खेळाडू ऋषभ पंतला डावलून दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. पंतच्या खऱाब यष्टीरक्षणामुळे त्याची निवड झालेली नाही असे पत्रकार परिषदेदरम्यान निवड समितीने सांगितले.

#WorldCup2019 हिंदुस्थानचा संघ जाहीर, वाचा कधी आहेत हिंदुस्थानचे सामने

‘आज तक’शी बोलताना माजी खेळा़डू आणि कर्णधार सुनील गावस्कर यांनी देखील या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केला, परंतु आता संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित न करत त्यांना विजयासाठी प्रेरणा देऊया असेही ते म्हणाले.

पंतला खराब यष्टीरक्षण भोवले
ऋषभ पंतने पदार्पणापासून आपल्या दणदणीत खेळीन सर्वांचे मन जिंकले. कसोटीमध्ये पंतने पहिल्या 9 सामन्यातच दोन शतकांसह 696 धावा चोपल्या. टी-20मध्ये देखील त्याने दणदणीत फलंदाजीचे दर्शन घडवत विश्वचषकासाठी आशा निर्माण केली होती. पंतच धोनीला पर्याय असू शकतो अशीही चर्चा सुरू झाली होती. परंतु फलंदाजीत छाप पाडणारा पंत यष्टीरक्षणामध्ये मात्र मार खात होता. बऱ्याचवेळा सोपे झेल, यष्टीचितच्या संधी त्याने दवडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचा पत्ता कट झाल्याचे मानले जात आहे.

कार्तिकची चांदी
2004 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या कार्तिकला गेल्या 15 वर्षात हिंदुस्थानच्या संघाकडून खेळण्याची संधी खूप कमी वेळा मिळाली. एवढ्या वर्षानंतरही त्याच्या नावार फक्त 26 कसोटी आणि 91 एक दिवसीय सामन्यांची नोंद आहे. यातही कार्तिकने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु धोनी असताना त्याला संघात स्थान मिळणे तसे कठीणच होते. परंतु 2018 ला श्रीलंकेत झालेल्या निधास ट्रॉफीच्या फायनलमध्ये कार्तिकने अशक्यप्राय विजय मिळवून दिला आणि त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यानंतरही कार्तिकने फलंदाजी आणि यष्टीरक्षणामध्ये भरीव योगदान देण्याचा प्रयत्न केला. अनुभव पाहता पंतऐवजी निवड समितीने कार्तिकवर डाव खेळला आहे.