हिंदुस्थानच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दुबईत ‘दंगल’ केक

सामना ऑनलाईन । दुबई

दुबईतल्या ब्रॉडवे बेकरीने हिंदुस्थानच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खास केक तयार केला आहे. हा केक तब्बल ५४ किलो वजनाचा असून या केकची थीम बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटावर आधारित आहे.

आमिर खान त्याच्या २ मुलींना शेतात प्रशिक्षण देतानाच्या दंगल चित्रपटातील दृश्यावर आधारित हा केक तयार करण्यात आला आहे. या केकची किंमत २६ लाख रुपये एवढी असून हा केक जगातील सर्वात महाग केक असल्याचा दावा ब्रॉडवे बेकरीने केला आहे.

ब्रॉडवे बेकरीच्या एका खास ग्राहकाच्या इच्छेखातर हा केक बनवण्यात आहे. केक बनवण्यासाठी शुगर फाँडन्ट, चॉकलेट स्पंज, चॉकलेट गनाश, बेल्जियम डार्क चॉकलेट आणि ७५ ग्रॅम एडिबल गोल्ड पावडर वापरण्यात आले असून केक बनवायला तीन आठवड्यांपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली आहे. हा केक तब्बल अडीचशे लोक खाऊ शकतील.