नेपाळ माऊंट एव्हरेस्टची उंची मोजणार

सामना ऑनलाईन । काठमांडू

‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ असं आपण बऱ्याचदा बोलताना म्हणतो, असंच काहीसं आता नेपाळच्या बाबतीत म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. जगाच्या नकाशात जरी नेपाळ इवलासा दिसत असला तरी त्याच्या जिद्दीची दाद द्यावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून नेपाळ हिमालयाची उंची मोजण्याची तयारी करत आहे. त्याच्यामागे एक महत्वाचं कारणही आहे. ते म्हणजे नेपाळ हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, २०१५ मध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपांमुळे जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या उंचीवर काही परिणाम झालेला आहे की नाही. नेपाळ असे पहिल्यांदाच करत असून तेथील सरकारी सर्वेक्षण विभागाच्या प्रमुखांनी सांगितले की, नेपाळने आतापर्यंत स्वतः माऊंट एव्हरेस्टची उंची कधीच मोजलेली नाही.

माऊंट एव्हरेस्टची माहित असलेली उंची ८,८४८ मीटर असून तो हिमालयाच्या पर्वतीय क्षेत्रामध्ये आहे. १९५४ मध्ये एका हिंदुस्थानी सर्वेक्षणात पहिल्यांदा एव्हरेस्टची उंची नोंदवण्यात आली. नेपाळकडून याआधीही उंची मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु तो अयशस्वी झाला होता.

उंची मोजण्याच्या मुद्द्यावरून नेपाळमध्ये आणि चीनमध्ये बऱ्याचदा मतभेद झाले होते. एव्हरेस्टची उंची मोजताना ती ‘रॉक हाईट’ (जिथर्यंत दगड आहे तिथपर्यंत) नुसार मोजावी असे नेहमी चीनचे मत असते, तर नेपाळ मात्र नेहमीच ही ऊंची जिथपर्यंत बर्फ आहे तिथपर्यंत मोजत होते. २०१० साली दोन देशांत माऊंट एव्हरेस्टच्या ८,८४८ इतक्या उंचीवर सहमती झाली होती. मे १९९९ मध्ये अमेरिकेने जीपीएसच्या मदतीने ८,८५० इतकी उंची मोजली होती.