मूलनिवासी!

>>दिलीप जोशी<<

khagoldil[email protected]

ऑगस्ट हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जगातल्या सर्वच ‘मूलनिवासी’ लोकांचा दिवस म्हणून पाळला जातो. मूलनिवासी किंवा आपण ज्यांना आदिवासी म्हणतो त्यांची सर्व जगातील संख्या सध्याच्या साडेसात अब्ज माणसांच्या तुलनेत फारच कमी म्हणजे अडीच ते साडेतीन कोटींच्या दरम्यान आहे. दुर्गम भागातल्या सर्वच जागतिक आदिवासींची निश्चित गणना ठाऊक नसावी असं यावरून वाटतं.

जगातल्या आदिवासींची माहिती गुगलवर शोधायला गेलं की, ज्यांना पाश्चात्त्य जग ‘इन्डिजिनस पिपल्स’, ‘नेटिव्ह’ किंवा ‘ऍबओरिजिनल’ म्हणतं त्यापैकी हिंदुस्थान आणि चीनसारख्या जगाची जवळपास निम्मी लोकसंख्या असलेल्या देशांमधील मूलनिवासींची नोंद फारच कमी आढळते. आपल्या महाराष्ट्रातच सुमारे बारा आदिवासी जमाती आहेत. त्यापैकी वारलींची चित्रशैली आता जगभर पोचलीय. गोंड आदिवासींची स्वतःची भाषाच नव्हे, तर स्वतंत्र लिपीसुद्धा आहे यावरून त्यांच्या जीवनशैलीत त्यांच्या पद्धतीने त्यांनी किती प्रगती केली होती हे दिसून येतं.

काळाच्या ओघात आदिवासी राज्य आणि त्यांची निसर्गाशी एकरूप होणारी संस्कृती जगात सगळीकडेच मागे पडली. म्हणजे ठिकठिकाणच्या तथाकथित प्रगत संस्कृतींचं वर्चस्व निर्माण झालं. एकेका टप्प्यावरचं यंत्रयुग आणि राहणीमानात होत गेलेले बदल जीवनशैली वेगाने बदलत गेले. त्यातच मुलूखगिरी, व्यापार आणि अधिकाधिक भूप्रदेश जिंकण्याची ईर्षा यातून माणसांचे प्रचंड जत्थे, समूह इकडून तिकडे गेल्यामुळे जगातील विविध खंडांतल्या लोकांच्या नागरी संस्कृतींची सरमिसळ झाली. हिंदुस्थानातही सिंधू, आर्य, द्रविड किंवा नंतर आलेले मोगल, इंग्रज यांच्या भिन्न जीवनशैलींचं हजारो वर्षे संमिश्रण होत होत आजची जीवनपद्धती तयार झाली आहे.

युरोपीय दर्यावर्दी लोक आफ्रिका, अमेरिका, हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया असे एकेक भाग व्यापारी उद्देशाने पादाक्रांत करत गेले आणि तेथील ‘नेटिवां’चा म्हणजे मूळच्या लोकांचा आधुनिक शस्त्र्ााद्वारे पराभव करून जेते ठरले. जेत्यांची संस्कृती जितांवर लादली जाण्याचा अनुभव सर्व जगाने कधी ना कधी घेतलाय. याशिवाय प्रवासी, व्यापारी आणि स्वखुशीने स्थलांतर करणाऱ्या लोकांच्या भिन्न जीवनपद्धतींचंही मिश्रण होत गेलं. आजही ते होतच असतं. त्यातून आजचं सांस्कृतिक ग्लोबलायझेशन दिसत आहे. त्यातही यथावकाश बदल होईलच. कारण संस्कृती ही प्रवाही गोष्ट आहे. नित्यनवीन गोष्टी आत्मसात करत ती पुढे जाते.

मात्र अशा जगातही आपल्या वसाहतीपुरतं आपली वैशिष्टय़े हजारो वर्षे टिकवून जीवन जगणारे अल्पस्वल्प मूलनिवासी आजही टिकून आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना जगभर घडलेल्या, आधुनिक समजल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचा पत्ताच नाही. ‘फिल्म्स डिव्हिजन’ने प्रेम वैद्य यांच्या दिग्दर्शनाखाली आपल्या अंदमान-निकोबार येथील ‘जारवा’ या आदिवासी लोकांवर बनवलेला ‘मॅन  इन सर्च ऑफ मॅन’ हा माहितीपट ४० वर्षांपूर्वी पाहिल्याचं आठवतं. या ‘जारवा’ मंडळींचं जीवनच विलक्षण होतं. आजच्या जगाचा स्पर्शही न झालेल्या अशा कितीतरी जमाती आज अमेरिकेतील ऍमेझॉन नदीच्या खोऱ्यात, आफ्रिकेत आणि रशिया, चीन, जपान या देशांत आहेत. जगातल्या प्रत्येक भूभागावर त्यांची वस्ती कमी-अधिक प्रमाणात आहे.

साधंसोपं जीवन जगणारे आदिवासी हिंदुस्थानातील जवळपास प्रत्येक राज्यात आहेत. त्यांच्या आरोग्याची, शिक्षणाची आणि एकूणच राहणीमानाची काळजी घेण्यासाठी आता आपल्याकडे विशेष मंत्रालयही असतं. कधी ना कधी ही मंडळी जगाच्या नव्या प्रवाहात येतीलच. परंतु त्यांची निसर्गसन्निध जीवनशैली लयाला जाईल की काय याची धास्ती वाटते. ती टिकवूनसुद्धा त्यांना आधुनिक जगाचे फायदे मिळण्यासाठीही अनेक संस्था कार्यरत असतात. या जगभरच्या मूलनिवासींनी परंपरेने जपलेल्या भाषा, संगीत आणि रानावनातील खाद्यान्न या सगळय़ा गोष्टी त्या त्या भागातील निसर्गावर अवलंबून आहेत. दाट जंगातल्या आदिवासींप्रमाणेच बर्फाळ प्रदेशात आणि वाळवंटात राहणारे आदिवासीही आहेत. ग्वाटेमाला, इक्वेडॉर येथील आदिवासींचे दागदागिने आणि वेश निराळा तर जपानमधल्या आयनू जमातीची पारंपरिक राहणी निराळी.

१९३९ मध्ये ‘मराठी निबंधकार’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. त्यात ल. रा. पांगारकर यांनी ‘एक गावंढळ तत्त्वज्ञ’ नावाचा वारली तरुणावरचा निबंध लिहिलेला आहे. एका रानातील हठयोग्याच्या दर्शनाला निघालेल्या या लेखकाला आदिवासी तरुण भेटतो. पांगारकर म्हणतात की, आधुनिक जगाची माहिती नसलेला आणि चार कोसांपलीकडचं जग ठाऊक नसलेला तो सृष्टीचा लाडका प्राणी होता. त्याने लेखकाचे सामान वाहून नेलं, पण त्यासाठी पैसे घ्यायला स्पष्ट नकार दिला. ‘आज’ मजेत जगणाऱ्या त्या आदिवासी तरुणाला ‘उद्या’ची चिंता सतावत नव्हती. पांगारकर लिहितात, ‘त्याची स्थिर मती पाहून माझा विद्येचा अहंकार जिरला! मृगजळाच्या मागे लागणारे आम्ही सुशिक्षित त्या वारली तत्त्वज्ञापेक्षा किती मूर्ख आहोत!’ नंतर लेखकाला हठयोग्याला भेटण्याची गरजच उरली नाही.

जगातील आदिवासींचं समाधानाचं जिणं आधुनिक ‘प्रगत’ जीवनात आहे का यावर सतत चर्चा होत राहील. ‘युनो’ने या आद्य मंडळींसाठी हा दिवस ठरवला आहे तो आदिवासींचा आत्मसन्मान आणि अधिकार अबाधित राहावा यासाठी. जगातल्या या आदिम संस्कृतींच्या वारसदारांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. त्यांच्या इच्छेने ते जरूर ‘आधुनिक’ होऊ शकतात, पण त्यांची संस्कृतीही टिकविण्यासाठी त्यांना मुभा असावी हा त्यामागचा हेतू आहे.