जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन

3

सामना ऑनलाईन । टोकियो

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती अशी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या जपानच्या मसाजो नोनाका यांचे रविवारी निधन झाले. ते 113 वर्षांचे होते. उत्तर जपानच्या ओशोरे येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. 2018 मध्ये गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती अशी त्यांची नोंद करण्यात आली होती. 25 जुलै 1905 मध्ये त्यांच्या जन्म झाला होता. गिनेस बुकमध्ये नोंद झाल्यावर गोड खाण्यामुळे आपण दीर्घायुषी झाल्याचे त्यांनी सांगितले होते.

रविवारी सकाळी मसाजो नेहमीप्रमाणे काम करत होते. मात्र, आरामसाठी बसल्यावर त्यांचा श्वास थांबल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलवल्यावर तपासणी करून मसाजो यांना मृत घोषीत करण्यात आले, असे त्यांच्या नातीने सांगितले. मसाजो यांच्या सात बहीणभावांचा याआधीच मृत्यू झाला आहे. तसेच त्यांची पत्नी आणि पाचपैकी चार मुलांचाही मृत्यू झाला आहे.