२०० टन सोन्यासह ११३ वर्षापूर्वी बुडालेले जहाज सापडले

सामना ऑनलाईन । मॉस्को

रशियावरून जपानला जाण्यासाठी सोने घेऊन निघालेले एक जहाज सापडल्याचा दावा दक्षिण कोरियन बचाव पथकाने केला आहे. या जहाजामध्ये २०० टन सोने असल्याचे बोलले जात असून त्याची किंमत १३० बिलियन डॉलर (आठ लाख कोटी रुपये) आहे. डेली टेलिग्राफने याबाबत वृत्त दिले आहे.

दक्षिण कोरियाच्या बचाव पथकाने केलेल्या दाव्यानुसार या जहाजाचे अवशेष द्विप उलुंगडोजवळ समुद्रात १,४०० फूट खोलीवर आढळले आहेत. रशियन इम्पिरियल नेव्हीचे सोन्याने भरलेले दिमित्री दोन्सकोई नावाचे हे जहाज १९०५ मध्ये बुडाले होते. जपानला सोन्याची निर्यात करण्यासाठी निघाले असताना ते बुडाले होते. या जहाजाचे अवशेष बाहेर काढण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर उजाडणार आहे.

रशियन जहाजाचा शोध घेण्यासाठी दक्षिण कोरिया, ब्रिटन आणि कॅनडाचे पथक एकत्र काम करत होते. या पथकांनी जहाजाचा शोध लावल्याचा दावा केला असून त्याचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत. त्यांनी अवशेषाचे फोटो काढण्यासाठी दोन पाणबुड्यांचा वापर केला.

रशियन जहाजावर सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांनी भरलेले ५,५०० बॉक्स होते. जहाज शोधून काढणाऱ्या सेऊलच्या शिनिल ग्रुपला जहाजाचे अवशेष ऑक्टोबर वा नोव्हेंबरपर्यंत बाहेर काढण्याची अपेक्षा आहे. कंपनीने म्हणणे आहे की, जहाजातून जितके सोने बाहेर येईल त्यातील अर्धे रशियाला सोपवले जाईल. सोन्यातून मिळणाऱ्या १० टक्के रकमेतून उलुंगडो द्विपावर म्युझियम स्थापले जाईल.