डॉक्टरांना न्यायालयाने बजावले, औषधांची नावे स्पष्ट लिहा !

सामना ऑनलाईन । ढाका

डॉक्टरांच्या किचकट अक्षरामुळे बऱ्याच वेळा रुग्णांबरोबर औषध विक्रेत्यांनाही औषधाचे नाव समजणे कठीण होते.यातून रुग्णांना चुकीची औषध दिले जाण्याची शक्यता असल्याने ढाका न्यायालयाने डॉक्टरांना अक्षर सुधरवण्याबरोबर औषधांची नावे मोठ्या अक्षरात लिहण्याचे बजावले आहे. न्यायालयाच्या या निर्देशनाचे सर्वच स्तरावर स्वागत होत आहे.

वकिल एम मंजिल यांनी यासंदर्भात एक जनहित याचिका न्यायालयात दाखल केली होती.यात डॉक्टरांनी स्वहस्ताक्षरात लिहून दिलेल्या औषधांची नावे कळत नाहीत.यामुळे विक्रेत्यांकडून बर्याच वेळा रुग्णांना चुकीची औषधे दिली जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. यामुळे डॉक्टरांना हस्ताक्षर सुधरवण्याची वा औषधांची नावे टाईप करुन देण्याची मागणी याचिकाकर्त्यानी केली होती. त्यावरिल सुनावणीत न्यायालयाने डॉक्टरांना हे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने याप्रकरणी आरोग्य विभागाला सूचना पाठवल्या असून सहा आठवड्यात याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यात डॉक्टरांनी कोणत्याही ब्रांडच्या नावाने औषध लिहून न देता जेनरिक औषधाचे नाव लिहावे असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.तसेच रुग्णांना औषधाचे नाव मोठ्या अक्षरात लिहून वा टाईप करुन देण्याचे निर्देश न्यायालयाने डॉक्टरांना दिले आहेत.