काटय़ाकुटय़ात फुललेली शब्दफुले

46

 

अनुराधा राजाध्यक्ष

साहित्यिक दत्ता पाटील… खाऱया मातीच्या घरातून आजच्या देखण्या घरापर्यंतचा त्यांचा प्रवास खरंच अनोखा…

दत्त पौर्णिमेचा जन्म माझा.. खारीपाडय़ातला.. चाळीस-पन्नास घरांचं ते गाव .. तिथली माती खारी.. धाब्याची घरं लिंपायला वापरली जायची ती म्हणून तो खारीपाडा …मी लहानपणी खूप अशक्त, आजारी असायचो… वयाच्या पाचव्या वर्षी मी चालायला लागलो.. आजारी पडलो की चांदवडच्या पुढे मनमाड रोडला खूप पायऱया चढून दत्तमंदिरात मला नेलं जायचं…तासभर दत्ता समोर ठेवून मी बरा झालो असं समजून मला घरी आणलं जायचं.. वडील शिक्षक.. त्यांची नंतर उमराणे गावी बदली झाली.. उमराणे जरा मोठं गाव . माझ्या वडिलांचा एकंदरीतच खूप प्रभाव आहे माझ्यावर असं मला वाटतं.. त्यांचं वाचन खूप.. ते गोष्टीवेल्हाळ.. ते गावात नाटकात कामही करायचे…नाशकात नाटक बघायला जायचे..गरिबी होती पण पुस्तकं यायची घरात… पैशाअभावी एक घर सोडायला सांगितलं की, त्या घराच्या आठवणी पुसत आम्ही दुसरं घर शोधायचो. चौथीमध्ये होतो तेव्हाचं घर उंचावर होतं.. दीड किलोमीटर दूर शाळा… रात्री हुशार मुलांसाठी जादा क्लास… तो संपल्यावर थोडावेळ मित्रांची सोबत असायची, पण नंतर मी एकटाच.. चपलेशिवाय चालत निघालेला… भीती वाटायची..वडिलांना बोलावलं मग.. ते यायचे कंदील घेऊन… आणि चालता-चालता गोष्टी सांगायचे..

त्यावेळी चांदण्यांनी भरलेलं आभाळ आजही ठसठशीत आठवतं.. ग्रह, तारे, ज्योतिष, वेद, अध्यात्म सगळ्याचा अभ्यास होता त्यांचा.. देव देव करणारे नव्हते ते समतोल विचार आणि आधुनिकतेची कास धरणारे होते… ते मोठय़ा खडय़ा आवाजात गोष्टी सांगायचे तेव्हा अंधारही त्यांना वचकून आहे असं वाटायचं आणि मला त्या कंदिलाच्या प्रकाशापलीकडच्या अंधाराचं मग काही देणंघेणं नसायचं… मात्र पंधरा-वीस दिवसांनी ते म्हणाले, ‘आता मी येणार नाही.. तुझं तू बघ.. माझ्याशिवाय कोणावर विश्वास आहे तुझा? त्याच्याशी बोल..’ तेव्हा देवाशी बोलावं म्हटलं तर मला देव कधी राम, दत्त, म्हसोबासारखा वाटलाच नाही… मग स्वतःशीच बोलणं सुरू झालं… प्रश्न विचारत गेलो मनातल्या देवाला, मग तो गोष्टी सांगायला लागला आणि मी त्यात सामील झालो..

त्या घरानं माझी भीती घालवली.. घरापुढे अंगण होतं, टेकाडावर चढून आमचं नदीकाठचं घर.. नदीपलीकडे आमराई.. त्या घरात मला वेड लागलं वाचनाचं.. स्कॉलरशिप मिळाली चौथीची… त्यावेळी शासन, पब्लिक स्कूलमधल्या मोफत शिक्षणासाठी ३० मुलं निवडायचं.. त्यात निवडला गेलो.. अशी निवड म्हणजे आंतरराष्ट्रीय विद्यापीठात नंबर लागण्याएवढं प्रतिष्ठेचं.. देवळ्याला आणि धुळ्याला दोन्हीकडे निवडला गेलो.. मी देवळ्यात ऍडमिशन घेतले आणि नंतर धुळ्याचं पत्र आलं.. तरी गेलो वडिलांबरोबर धुळ्यात.. वडील ऍडमिशनसाठी ऑफिसमध्ये गेले तेव्हा मी पेटीवर बाहेर बसून होतो.. तो परिसर, हॅरी पॉटरच्या विद्यापीठासारख्या वाटला मला.. भारावलो होतो मी… भव्य लायब्ररी, महात्मा गांधींचा पुतळा, बाग, फुलपाखरं.. मला वाटलं दुर्गंधीशी संबंध संपला आपला.. पण वडील म्हणाले,’ आपल्याला उशीर झालाय …दुसऱयालाच प्रवेश दिलाय त्यांनी..’ माझी सुवर्णसंधी हुकली म्हणून खूप रडलो मी.. उमराण्यात परतलो..

नाना कुलकर्णी उमराण्यातलं बडं प्रस्थ.. आमचे कळकट पाय घेऊन आम्ही उभे राहायचो त्यांच्या वाडय़ासमोर.. त्यांच्याकडे पुलं, सुनीताबाई, यशवंतराव चव्हाण अशी मोठी माणसं यायची.. ते आम्हालाही कधी तरी काही खायला बोलवायचे.. तिथे पुस्तकं बघायचो. ते ड्रीम होम होतं माझं.. शेजारीच गोविंद कुलकर्णींचं घर.. त्यामानानं छोटं.. पण तेव्हा वाटायचं एवढं तरी असावं आपलं घर.. सहावीत होतो, तेव्हा अचानक वडील तिथे दिसले.. ‘आपण हे घर भाडय़ानं घेतलंय’ म्हणाले.. तिथे मागच्या बाजूला अंधारी खोली होती.. तिथे गोविंद कुलकर्णींची म्हातारी बायको रहायची.. त्यांच्या मुलानं सांगितलं होतं की, हिला सांभाळा. . आम्ही तिला स्वीकारलं… समजून घ्यायचा प्रयत्न केला.. ती सोवळं पाळणारी होती.. आम्ही शेतकरी मराठा… एक अलिखित सीमारेषा होती आमच्यात.. तिला फुलझाडांची आवड.. ती पहाटे आडातून रहाटानं पाणी काढायची.. मी मदत करू का असं विचारलं, तर झिडकारायची.. मी सदाफुली, गुलबकावली तिच्या झाडाशेजारीच लावली आणि पाणी घालायला लागलो. संवाद नव्हता फारसा, पण हळूहळू ती हसायला लागली.. जिव्हाळा निर्माण झाला..

टिळकांच्या छावा मासिकाची वर्गणी मोठय़ा भावाने भरली होती. मासिकात स्पर्धा आली होती चित्राला नाव द्या. त्यात भाग घेतला… ‘निळ्या अथांग सागरी, पक्षी आले स्नानावरी’ असं लिहून पाठवलं.. एक महिन्यानी पहिल्या बक्षिसाची दहा रुपयाची मनिऑर्डर आली.. ज्यावेळी ५० पैशांत पूर्ण जत्रेत मजा करायचो आम्ही त्यावेळचे हे दहा रुपये खूपच होते.. माझ्या लिखाणाला मिळालेलं हे पहिलं बक्षीस… काय करायचं त्याचं? प्रश्न पडला सगळ्यांनाच… तेवढय़ात हातगाडीवाला, ‘देव्हारे घ्या’ ओरडत आला.. आम्हालाच घर नव्हतं आमच्या देवांना कुठून असणार? पाटावर बसायचे ते.. मग घासाघीस करून दहा रुपयांचा देव्हारा घेतला.. देवांना घर मिळालं, मग बहुतेक त्यांनीही आमच्या घराचं मनावर घेतलं… गोविंद कुलकर्णी यांचा मुलगा आला म्हणाला, ‘घर विकायचंय १,००,००० रुपयांना..’ तेवढे पैसेच नव्हते आमच्याकडे..पण तो म्हणाला, ‘तुम्ही घराचं पावित्र्य राखलं, आईला सांभाळलं, कुठल्यातरी मारवाडय़ाला घर देण्यापेक्षा तुम्हीच घ्या..’ सोनं नाणं विकून जेमतेम ३५,००० जमले. तेवढेच घेऊन गेला.. त्यांच्या आईनंच बहुतेक कानात सांगितलं असावं हे त्यांच्या.. आजतागायत उरलेले पैसे घ्यायला आले नाहीत ते… सहावीत असताना धुळ्याच्या पब्लिक स्कूलमधून पत्र आलं.. माझ्या जागी ज्या मुलाला ऍडमिशन दिली होती. मला बोलावलं होतं.. वडील आणि आई दोघेही नाही म्हणत होते, पण माझ्या मोठय़ा दोन्ही भावांनी आग्रह धरला आणि मग आली माझी वरात धुळ्यात.. तिथे मला सगळंच मिळालं.. पण दुसरीकडे अभ्यासात मी मठ्ठ झालो होतो.. आठवीत वर्गात ३० विद्यार्थी होते तर माझा नंबर ३० वा.. दहावीत तर नापासच झालो.. मग गावी परत आलो… त्या काळात असहाय मानसिकतेवर मुक्तछंदात्मक कविता लिहिली.. ‘अमर्याद समुद्र आणि विचित्र ध्येयसक्तीनं फेसाळणाऱया त्याच्या लाटा… आदळतात किनाऱयावर येऊन मत्तपणे अगतिकतेनं…

त्याकाळात आडावर पाणी शेंदायला एक मुलगी यायची.. ती दहावीत मी अकरावीत.. मला आवडली ती.. माझे पाच हंडे भरून झाले की तिचा एक हंडा भरून द्यायचो.. उंबराच्या झाडाखाली बासरी वाजवत बसायचो.. तो आवाज ऐकून ती यायची पाणी भरायला… तिला प्रेमपत्रं पाठवलं. महिन्याभरानं उत्तर आलं.. तिचं नाव प्रतिभा.. तिच्याशीच पुढे लग्न झालं..

मला जायचं होतं आर्टसला.. वडिलांनी एलएलबीला नाशिकला ऍडमिशन घ्यायला लावली.. सकाळच्या नोकरीत असताना बायकोच्या घरच्यांकडून खूप विरोध असतानाही मित्रांच्या मदतीनं त्र्यंबकेश्वरला जाऊन लग्न केलं.. माझ्या आईची तशी इच्छाच होती की, या काळ्याला ही सुंदर बायको मिळायालाच हवी.. तीच म्हणाली होती, ‘मुलीच्या घरचे नाही म्हणाले तर पळून जाऊन लग्न कर..’ लग्न झालं आणि त्यावेळी नोकरीत सुट्टी दिली नाही म्हणून मी कांबळेंशी भांडून राजीनामा दिला… नंतर गावकरी दैनिकात.. दत्ता सराफ, अपर्णा वालावलकर, यांनी माझ्यातल्या लेखकाला घडवलं.. माझी बायको श्रीमंत सावकारीचा पिढीजात धंदा असणाऱया घरातली.. माझ्यासारख्या दळभद्री लेखकाच्या घरी ती आली होती.. आम्ही कंदील लावून राहायचो ९५-९६मध्ये.. कडुलिंबाचा पाला जाळून डास घालवायचो.. ९६ मध्ये मुलगी झाली आम्हाला.. मुलीवर चांगले संस्कार होतील असा परिसर हवा होता मला घराचा..त्यासाठी खूप वणवण केली मी..

नंतर खूप लिहिलं.. मध्यमपदलोपी, मॅनिया, साडेमाडे शंभर अशा अनेक एकांकिका, खेळीया, डेटिंग विथ रेन, गढीवरच्या पोरी, हंडाभर चांदणं अशी अनेक नाटकं, बुचाच्या झाडांवरचे पक्षी हा कवितासंग्रह… गदिमा साहित्य पुरस्कार, कविवर्य नारायण सुर्वे विशेष साहित्य पुरस्कार विशेष लक्षवेधी प्रायोगिक नाटकांचा झी गौरव पुरस्कार, नाटय़निर्माता संघाचा दीर्घांक पुरस्कार त्यांचाच लेखन पुरस्कार, चैत्र सन्मान पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे मी… नोकरी सोडून स्वतःची जाहिरात संस्था सुरू केली आहे आता.. स्वतंत्र विचारांना व्यक्त करण्याचं मुक्त स्वातंत्र्य अनुभवत माझा लेखन प्रवास सुरू आहे… स्वप्नातलं घर सत्यात आणण्याचं स्वप्नही आता पूर्ण झालंय. जिथे सुचेल तिथे लिहिता येतं मला.. अगदी गप्पा मारता-मारतासुद्धा लिहू शकतो मी ..२०१२ मध्ये आई आणि २०१३ मध्ये वडील गेले, पण तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये ते भेटतात कुणाच्या ना कुणाच्या रूपात.. चिंतनशीलता आणि सुलभीकरण आता माझ्या लेखणीला सवयीची झालीय.. वाटतं, अंतराळाशी जेव्हा आपण परिचित होतो तेव्हा आपण सुलभ होतो..

पक्ष्यांचा थवा उडाला, तर तो तसाच सांगावा उगाच त्याला अलंकार चढवू नयेत .. भरभरून बोलत होते दत्ता पाटील… बायकोचं नाव त्यांच्या प्रतिभा.. त्यामुळे लिखाणात आणि जगण्यातही प्रतिभावंत असणारा हा लेखक.. प्रत्यक्ष प्रतिभेच्या हातची भाकरी, वांग्याची भाजी, ठेचा, आमरस असं जेवण मिळण्याचं सौभाग्य अनुभवत गप्पांना सोबतीला घेऊन मी त्यांच्या देखण्या घरातून निघाले खरी पण तेव्हाही आणि हा लेख लिहितानाही हेच जाणवत राहिलं की, कितीही ऐकलं तरी शिल्लक आहेच काहीतरी ज्यांच्याकडून ऐकण्याचं आणि कितीही लिहिलं तरी बाकी आहेच ज्यांच्याबद्दल लिहिण्याचं, असा लेखक म्हणजे दत्ता पाटील…

 

आपली प्रतिक्रिया द्या