अवीट गाडीची वऱहाडी बोली!

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

ड़ॉ. प्रतिमा इंगोले… वऱहाडी बोली त्यांच्या घरात नांदते… लोकगीतं… लोककथा, शेतकऱयांच्या आत्महत्या… ग्रामीण भागातील प्रत्येक दिवस प्रतिमाताईंच्या लेखणीतून प्रसवलेला…

महाराष्ट्रातल्या स्त्रीला सगळ्यात आवडतं ते तिचं घर… माहेर असो की सासर, ती घरासाठीच जगत असते. ‘‘बालसाहित्यकार, कवयित्री आणि नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी अशा विविध विषयांवर वैचारिक लेखन करणाऱया प्रतिमा इंगोले यांच्याशी बोलत होते तेव्हा त्यांनी किती सहजतेनं त्यांचा जीवनपट माझ्यासमोर उलगडला. ‘माझं लहानपण अकोल्याचं. आजोबा हेड कंपाऊंडर. क्वार्टर मिळाली होती त्यांना. खूप मोठं अंगण. तिथे गुलाब, चमेली… पण मी दीड वर्षाची असताना वडील गेले आणि मला, आईला तिथे उपेक्षेची वागणूक मिळायला लागली.

प्रतिमाताईंच्या आयुष्याचा हा खडतर प्रवास त्यांना ग्रामीण भागातल्या समस्या आणि जीवघेणा संघर्ष आपल्या लेखनातून प्रखरतेने मांडण्यासाठी प्रवृत्त करून गेला असणार हे निश्चित. त्या पुढे सांगत होत्या, ‘बापूंचं भाषेवर, व्याकरणावर प्रभुत्व. ते कवीसुद्धा होते. शाळा सुटल्यावर ते मला घेऊन बसायचे अभ्यासाला. ओटय़ावर इतर मुलं खेळत असायची. मला तिथे जावंसं वाटायचं, पण बापूंचा नैतिक धाक होता. मी कुठेही असले तरी ते घरी येत आहेत हे कळल्यावर मी धावत पळत घरी येऊन हातपाय धुऊन त्यांना पाणी द्यायचे.’ प्रतिमाताई लेखिका म्हणून घडण्यात बापूंच्या भाषेच्या संस्कारांचा सिंहाचा वाटा असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. ग्रामीण बाजाचं लिखाण त्या करू शकल्या त्या बापूंच्या आणि दानापूर गावच्या जीवनशैलीमुळे. बापूंच्या घरात म्हणजे वाडय़ात बापूंचे चुलत भाऊ, पुतणे, सगळेच एकत्र राहायचे. पापड, दिवाळीचे कानवले, हरतालिका सगळं एकत्र व्हायचं. लोकगीतांची गंगा वाहत होती तिथे. बहुरूपी यायचा. जात्यावर दळण व्हायचं तेव्हा ओव्या गायल्या जायच्या. प्रतिमाताई म्हणाल्या, ‘बापूंना गावात आदर होता आणि त्यांची एकुलती एक मुलगी विधवा झाली म्हणून तिच्याबद्दल माया आणि तिची मी एकुलती एक मुलगी म्हणून माझ्यावर सगळ्या गावानं प्रेम केलं. बापूंचं घर मला खूप आवडायचं. मोठमोठय़ा खिडक्या होत्या. खिडकीत पाय लावून बसायचे मी आणि मोठमोठय़ानं कवितेला चाली लावून त्या म्हणायचे एकटीच. एकपाठीच होते तशी मी. पाचवीत हिंदीची परीक्षा होती. आईला वाटत होतं मी अभ्यास करत नाही, पण मी पूर्ण पुस्तकच पाठ केलं होतं. दहापैकी पाच प्रश्न सोडवायचे होते. मी सगळेच सोडवले. पहिली आले. तशी सातवी आणि आठवीलाही पहिली आले.’

प्रतिमाताई सांगत होत्या. ‘तेव्हा मुली अटी घालायचा नाहीत, पण लग्नानंतरही मला शिकायचं आहे आणि लग्नही परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्यातच करू अशी अट मी घातली. ती मंजूरही झाली पण दुर्दैवानं विद्यापीठाच्या संपामुळे पेपरची तारीख पुढे ढकलली गेली आणि ती लग्नानंतर असल्यामुळे मला पेपर देता आले नाहीत. यजमानांची वकिली आणि नणंद-दिरांचं शिक्षण यासाठी भाडय़ानं घर घेतलं दर्यापूरला. पण सगळ्यांची देखभाल करताना माझ्या राहिलेल्या दोन पेपरची आठवण नव्हतीच कोणाला. बापूंकडे गेले की त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे निघताना गावातले सगळे गोळा व्हायचे आणि नमस्कार केला की हातावर एक रुपया टेकवायचे. माझ्याकडे ते खाऊचे पैसे होते. एप्रिलमध्ये परीक्षा देण्याच्या उद्देशानं दिराला फॉर्म आणायला सांगितला. परीक्षेची फी त्या खाऊच्या पैशातून भरली आणि मी बीए झाले. खरं तर एम.ए. करायचं होतं मला. पण सगळ्यांचं करता करता माझं शिक्षण दुर्लक्षितच राहिलं. नंतर दर्यापूरलाच आम्ही भाडय़ानं दुसरं घर घेतलं. पत्र्याचं. खूप तापायचं ते.

बापूंनी भाषेचे संस्कार केले होते, पण माझ्या जमान्यात, ‘लेखिका व्हायचं’ असं ठरवलं वगैरे जात नव्हतं. ना. सी. फडके, गुलशन नंदा आणि डिटेक्टिव्ह कादंबऱया रात्र रात्र वाचायचे. पण हे वाचताना वाटायचं, या लिखाणात नायक-नायिका बागेत भेटतात, प्रेमात पडतात हे सगळं काल्पनिक आहे. कारण त्या काळी माझ्याभोवती तरी असा कुठला बगिचा वगैरे नव्हता किंवा पुस्तकासारखं प्रेम व्यक्त करणंही नव्हतं. फुलांचे गजरे पुस्तकातली नायिका घालायची. पण आम्हाला फुलांचे दोनच उपयोग माहीत होते. देवाला किंवा प्रेताला वाहण्यासाठी. त्यामुळे आपण जे जगतो ते आपल्याला वाचायला मिळत नाही आणि आपण जे वाचतो ते चांगलं असलं तरी आपल्याला जगता येत नाही याची नोंद मनानं घेतली. दानापूरची मुलगी कापसाची फुलं वेचायची आणि भाकरीची स्वप्नं पाहायची. यापलीकडचं स्वप्न बघण्याची उसंतच मिळत नव्हती तिला. त्यामुळे आपण जे जगतो ते लिहिलं पाहिजे असं कॉलेजमध्ये असल्यापासूनच वाटायचं. पण लग्न झालं आणि सगळंच बाजूला पडलं. मात्र या पत्र्याच्या घरात झालं काय की यजमान कोर्टात आणि मुलगी शाळेत गेल्यानंतर मी ‘तरुण भारत’ पेपर वाचायचे. ‘बंडी उलार झाली’ म्हणजे बैलगाडी उलटी झाली हे विनोदी कथांचं सदर होतं त्यात. ते आवडायचं मला. वाटायचं आपणही असं लिहू शकतो. पण एवढय़ा मोठय़ा पेपरपर्यंत ते पोहचवायचं कसं हा प्रश्न होता. माझ्याकडे बापूंकडून येताना मिळालेले खाऊचे पैसे होतेच. मी पोस्टाचं पाकीट आणलं. त्यात कथा घातली आणि पाठवून दिली ‘तरुण भारत’च्या पेपरमधल्या पत्त्यावर. वाटलं फाडायची तर त्यांना फाडू देत. त्यावेळी प्रभाकर शिरास संपादक होते. त्यांना कथा खूप आवडली. त्यांनी पत्रही लिहिलं, ‘तुमच्याकडे तरल विनोदाचा धागा आहे’. तीन आठवडय़ांत त्यांनी कथा छापली रेखाचित्रासह. माझं टिनाचं ते घर आरोग्याला नसलं तरी लिखाणाला पूरक ठरलं.

दर्यापूरला प्लॉट घेतला. आऊटहाऊस बांधलं. कौलारू होतं ते. माझी पहिली कादंबरी या आऊटहाऊसमध्येच सुचली मला. झालं असं की, बाहेर खूप मोठी जागा होती. तिथे मी धणे पेरले होते. पण त्या वर्षी पाऊसच पडला नाही. त्यामुळे ते उगवलेच नाहीत. पुढल्या वर्षी पाऊस पडला तेव्हा धणे पेरल्याचं मी विसरून गेले होते. सकाळी चक्कर मारायला म्हणून बाहेर पडले आणि पाहिलं तर कोथिंबीर. आमच्या भाषेत सांबार उगवलेलं. गेल्या वर्षी पेरलं होतं मी ते, जे मी विसरून गेले होते पण जमिनीनं ते राखलं होतं. ‘बुढाई’ कादंबरीचा जन्म त्यातूनच झाला. तिला नंतर राज्य पुरस्कारही मिळाला. पिकाऊ जमीन क्षेत्र कमी होण्याचा भयंकर परिणाम, पुढे आपल्यालाच भोगावा लागणार आहे हे मी त्यात मांडलं होतं. दर्यापूरला नंतर घर बांधलं. पण त्या आऊटहाऊसमध्ये खरंच खूप लिहिलं.

दुर्गा भागवतांनी आवाहन केलं होतं. लोकगीतांच्या रूपातलं लोकधन वाचवा. मला प्रेरणा मिळाली. मी प्राध्यापक होते आणि ती जागा टिकवण्यासाठी मला पी.एचडी. करणं भाग होतं. ‘वऱहाडी लोकगीतांचा चिकित्सक अभ्यास’ असा विषय निवडून मी दहा वर्षं विदर्भात फिरले. अनेक व्यक्तिरेखा त्यात मिळाल्या. बोरं विकणाऱया एका बाईला घरी बोलवून तिच्याकडून 200 गाणी जमा केली. ती अशिक्षित बाई बोरं वेचून आणि विकून आपली उपजीविका करायची. मी तिला म्हटलं, ‘तुम्ही घरी जेवण बनवू नका, बोरं वेचायला लवकर जा. एक पायली मी रोज घेईन आणि तुम्हाला जेवायलाही घालीन.’ तिच्याकडून मी गाणी ऐकली, लिहिली. तिला जवळपास दोनशे गाणी पाठ होती. आमच्या घरी यजमान वकील असल्यानं पक्षकार यायचे. त्यांच्या कथा आणि व्यथा, शेतकऱयांच्या आत्महत्या याबद्दलही लिहावं वाटलं. कारण मला वाटलं आपण बाकी काही करू शकत नाही, निदान त्यांना भेटून सांत्वन तर करू शकतो. त्यांची व्यथा आपल्या लेखणीतून लोकांपर्यंत तर पोहचवू शकतो. सहा वर्षं त्यासाठी विदर्भात फिरले. ‘आत्मघाताचे दशक’ हे पुस्तक त्याचंच फलित.

शेतकऱयांच्या आत्महत्यांसंदर्भात संदर्भग्रंथ म्हणून प्रतिमाताईंचं हे पुस्तक वापरलं जातं अनेकदा. मानवतेची शिकवण त्यांना बापूंनी दिली. बापू आजोबा आणि बापू धर्माधिकारी. दोन्ही बापूच. मानवतेशी एकनिष्ठ राहून त्यांनी लेखन केलं. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडल्या नाहीत. नैतिकता झुकू दिली नाही. मनाला जे पटलं तेच केलं. त्यांची लेखणी समाजाला उपयोगी पडावी म्हणूनच त्यांनी ती लिहिती केली. सध्या त्या पुण्यात राहतात. खरं तर घर ही संकल्पना त्यांच्या मते प्रत्येक लेखकानं वाढवायला हवी. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे, ‘हे विश्वचि माझे घर’ तसं आता प्रतिमाताई फक्त विदर्भाला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला घर मानतात. ‘पूर्ण महाराष्ट्र जसा माझा, तशी या महाराष्ट्राला मी त्यांची वाटावे एवढीच इच्छा आहे’ असं म्हणणाऱया प्रतिमाताईंशी बोलताना हे प्रकर्षानं जाणवलं की इच्छा तिथे मार्ग, शोधा म्हणजे सापडेल, सूर्य होऊन जगा अंधार तुम्हालाच घाबरेल.