ह. मो. मराठे

>>प्रशांत गौतम<<

मागच्या आठवडय़ात ‘सिंहासन’कार अरुण साधू गेले.  काल जळगावचे ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट गेले. आज ह. मो. मराठे गेले. खरे तर या तिघांनीही साहित्य पत्रकारितेला आपल्या वैशिष्टय़पूर्ण लेखनाने नवे आयाम दिले. ह. मो. मराठे यांनीही पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात आपल्या वैशिष्टय़पूर्ण शैलीदार लेखनाने वेगळी मुद्रा उमटवली. ५ वर्षांपूर्वी चिपळूण येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. पण आपल्याच एका लेखामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. परिणामी, साहित्य संमेलनाला लोकप्रिय लेखक, व्यासंगी पत्रकार अध्यक्ष म्हणून लाभला नाही. साहित्य क्षेत्रात ह. मो. मराठे कथा-कादंबरीकार, वैचारिक लेखक म्हणून प्रसिद्ध होते.

ह.मों.चा जन्म १९४० च्या सुमारास कोकणातील दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावातील एका गरीब कुटुंबात झाला. वडिलांना ‘सिझोफ्रेनिया’सारखा आजार, आईसुद्धा सतत आजारी. त्यात आर्थिक संकट. अशा कठीण प्रसंगात ह.मों.चे वडीलबंधू बाबल यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेत असतानाच छोटय़ा-मोठय़ा नोकऱ्या करत त्यांनी कुटुंबाला हातभार लावला. बालवयापासूनच वाचनाची आवड त्यांना होती; त्यातूनच त्यांना लिखाणाचा छंद लागला. महाविद्यालयात असतानाच त्यांचे विविध लेख, कथा विविध नामांकित मासिकांत प्रसिद्ध होत गेल्या. १९६९ च्या सुमारास ‘निष्पर्ण वृक्षावर भरदुपारी’ ही लघु कादंबरी साधना मधून प्रकाशित झाली आणि त्यांना साहित्य क्षेत्राची वाटचाल करीत असताना या लघु कादंबरीने लेखक म्हणून नवी ओळख निर्माण करून दिली. आजही ही लघु कादंबरी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. त्यानंतर आलेली ‘काळेशार पाणी’ याही लघुकादंबरीने मराठी साहित्य विश्व ढवळून काढले. विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांमध्ये संपादक म्हणून कार्य करीत असताना त्यांनी साहित्य पत्रकारितेमध्ये नवनवीन प्रयोग केले आणि ते यशस्वी ठरले. ह.मों.च्या लेखन प्रयोगामुळे ते ज्या ज्या दैनिकांत, मासिकांत संपादक म्हणून ठसा उमटवायचे त्या त्या नियतकालिकांचा खप हा उंचावलेला असे. त्यांच्या प्रयोगाला वेळोवेळी वाचकांनी भरभरून दाद दिली. किर्लोस्कर, स्त्र्ााr, मनोहर, घरदार अशी काही मोजकी नावे सांगता येतील. किर्लोस्कर परिवारातील किस्त्र्ााrम (किर्लोस्कर, स्त्र्ााr, मनोहर) यांच्या दिवाळी अंकांनी, त्यातील लेखनाने वाचकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले. ह.मों.चे आणखी एक वैशिष्टय़पूर्ण लिखाण म्हणजे एक माणूस एक दिवस हा प्रयोग. त्यातून त्यांनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबत घालवलेला संपूर्ण एक दिवस, सहवासात आलेल्या अनेकविध आठवणी याचे विस्ताराने वर्णन केले आहे. विविध दैनिकांतील हे स्तंभलेखन तीन भागांत पुढे पुस्तकरूपाने आले. ‘अण्णांची टोपी’, ‘इतिहासातील एक अज्ञात दिवस’, ‘ज्वालामुखी’, ‘इतिवृत्त’, ‘कलियुग’, ‘घोडा’, ‘टार्गेट’, ‘देवाची घंटा’ हे कथासंग्रह, ‘निष्पर्ण वृक्षावर’, ‘भरदुपारी’ ही लघु कादंबरी. ‘आजची नायिका’, ‘उलटा आरसा’, ‘दिनमान’, ‘द बीग बॉस’, ‘मुंबईचे उंदीर’, ‘माधुरीच्या दारातील घोडा’ हे उपरोधिक लिखाण. ‘श्रीमंत श्यामची आई’, ‘व्यंगकथा’, ‘स्वर्गाचे सुख’ (विनोदी), ‘एक माणूस एक दिवस’ हे तीन भागांतील लेखन, ‘पहिला चहा’ हे दोन भागांतील स्तंभलेखन न लिहिलेले विषय (वैचारिक), ‘मधलं पान’, ‘मार्केट’, लेखसंग्रह, ‘युद्ध’, ‘लावा’ (हिंदीतील लेखन), त्याचप्रमाणे ‘सॉफ्टवेअर’, ‘हद्दपार’, ‘आधी रोखल्या बंदुका’, ‘आता उगारल्या तलवारी’ असे वैविध्यपूर्ण त्यांचे लेखन बरेच गाजले. ह.मों.च्या लेखनाचे खास वैशिष्टय़ म्हणजे त्यांचे कथासंग्रह. त्यांच्या ‘घोडा’ या कथासंग्रहात कार्पोरेट कल्चर, त्यातील राजकारण, अस्तित्वासाठी करावी लागणारी लढाई या बाबींची सत्यता वाचकांना वेगळय़ा कथा वाचताना आली. यातील चेअरमन नावाचे पात्र तर अनेक कथासंग्रहांत भेटले. ‘बालकांड’ या नावाचे आत्मकथन ह.मों.नी लिहिले. या प्रदीर्घ आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथन प्रकारात वेगळी पाऊलवाट निर्माण केली. वडिलांच्या विक्षिप्त स्वभावामुळे संपूर्ण कुटुंबाची झालेली फरफट वाचकांना अस्वस्थ करून जाते. या आत्मचरित्रात वापरलेली गोवा-महाराष्ट्र सीमेवरील ब्राह्मणांची चितपावणी बोली मराठी साहित्यात आजपर्यंत कोणत्याही लेखकाने आणली नाही. या आत्मकथनात वडिलांच्या स्वभावामुळे होणारी ससेहोलपट, विस्कळीत आयुष्य यांचे खरेखुरे चित्रण केले आहे. लेखकाने कुठेही अतिशयोक्ती न करता वाचकांच्या डोळ्यांत पाणी आणण्याचे सामर्थ्य निर्माण केले आहे. आपल्या बालवयात अभावग्रस्त आयुष्याचे कुटुंबीयांच्या पराकोटीच्या शोषणाचे चित्रण ह.मो. मराठे कलात्मकतेने करतात. ‘बालकांड’ आत्मकथनातील संपूर्ण लेखन हे कोकणातील सहा ठिकाणी घडते. सावंतवाडीच्या जवळ असलेल्या झोळम्बे नावाचे खेडेगाव, गोव्यातील सुर्ल नावाचं खेडं, तिथली तेलबांध नावाची वाडी. गोव्यातील नानोडा गाव, नरसोबाची वाडी अशा ठिकाणी या आत्मकथनातील लेखन घडले आहे. ह.मों.च्या निधनाने साहित्य, पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांची हानी झाली आहे.