त्यांच्या घरात बुद्धिदेवतेची मैफल रंगते…

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

सुमेध वडावाला रिसबूड… त्यांच्या लेखणीतून उतरलेली मनश्री वडावालांच्या मनस्वीपणाची प्रतिकृती आहे…

2013 मधलं चिपळूणचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. सुमेध वडावाला (रिसबूड) जन्मांध मनश्रीची मुलाखत घेत होते. मुख्य मंडप दुथडी भरून वाहणारा. गाण्यात प्रावीण्य मिळवलेली, त्याआधारे बालश्री मिळवलेली मनश्री तेव्हा कॉलेजमध्ये होती. दृष्टिहीनत्वामुळे बिकट झालेला प्रवास ती मधूनच गाऊन उलगडत होती. बालपणी सामान्य मुलांच्या शाळेत तिला प्रवेश नाकारला होता. रिक्षावाल्यानं भीक मागण्यासाठी चार वर्षांच्या मनश्रीला पळवून नेलं होतं. बालश्री प्रदान सोहळ्यात अब्दुल कलामसाहेबांनी कौतुकानं विचारलं होतं, ‘‘कब आओगी मनश्री हमें वापस मिलने?’’ त्यावेळी तिनं उत्स्फूर्तपणे सांगितलं होतं, ‘‘आज ‘बालश्री’ स्वीकारने आयी हूँ, भविष्य में ‘पद्मश्री’ लेने के लिये आ जाऊंगी.’’ त्या दुर्दम्य आत्मविश्वासदर्शी गप्पा माणसं डोळे पुसत ऐकत होती. सुमेध वडावालांना त्यावेळी मिळालेलं स्टँडिंग ओव्हेशन हा सर्वोत्तम पुरस्कार वाटतो. ‘मनश्री’ ही आत्मकथा त्यांचीच. राजहंस, मॅजेस्टिक, मेहता, ग्रंथाली अशा प्रतिष्ठत प्रकाशकांनी त्यांची तीस पुस्तकं प्रकाशित केली, ज्यात डझनभर आत्मकथा आहेत. या लेखनाचं साक्षीदार आहे ते त्यांचं दोन खोल्यांचं घर. पुरेसं. ‘‘मी सडाफटिंग. इथला पसारा, अजागळपणा नजरेआड करा. रंग-रूप, बुद्धी जशा निसर्गदत्त असतात तशीच बेफिकिरी, अव्यवस्थितपणा माझ्या अंगभूतच आहे आणि लेखनकलाही. ती काही कमावलेली नाही’’ वडावाला सांगत होते.

1962 साली कोकणातल्या ‘खेडला’ सुशिक्षित घरात जन्मलेल्या सुमेधना शिक्षणात गम्य किंवा गती नव्हती. विलेपार्ल्यात ते मामांकडे आले. सुप्रसिद्ध विजय स्टोअर्सचे मालक अण्णा साठे हे त्यांचे मामा. भाऊ सुदर्शनमुळे 1983 मध्ये चांगल्या कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. पोटापाण्याचा प्रश्न सुटला. मग अकल्पितपणे ते लिहायला लागले. मासिकांनी तत्परतेनं नाकारलेल्या कथांनी यशाचा पाया पक्का केला, पण लेखनाचे विषय आणि मांडणी एवढी वेगळी होती की, निरंजन घाटे यांनी भविष्यात मेहतांकडे शब्द टाकला. ‘सांजवा’ कथासंग्रह निघाला. कथालेखनातलं अव्वलत्वच सिद्ध होऊनही त्यांनी ते लेखन थांबवलं. मराठी साहित्य जगत केवळ दर्जाला किती प्रमाणभूत मानतं याच्या चाचपणीसाठी ‘अंतर्नाद’ मासिकात ‘सफाई’ ही कादंबरी 2005 मध्ये प्रकाशित झाली. त्यावेळी त्यांनी वेगळंच टोपणनाव घेतलं होतं. ‘महानगरी दलित कादंबरी’ म्हणून वाचकांनी पसंती पत्रांचा पाऊस पाडला, पण प्रकाशकांनी कादंबरीकडे पाठ फिरवली ती या नव्या टोपणनावामुळे. कादंबऱयांची इथली सद्दी संपली आहे असा निष्कर्ष काढून 2005 नंतर वडावाला आत्मकथा लेखनाकडे वळले. जेव्हा कथालेखनानंच कौशल्यसिद्धी दिली होती त्या जडणघडणीच्या काळात वडावाला मामांकडे राहत होते. रोज संध्याकाळी विजय स्टोअर्सच्या काऊंटरवर ते उभे राहायचे.

‘‘मामाच्या मालकीची पूर्ण इमारत होती. घर म्हणजे अख्खा मजला होता. अण्णांचा गणेशमूर्ती विक्री व्यवसायही होता. तिथली माझी मदतही अनिवार्यच. बुद्धिदेवतेनं माझ्या अक्षरांनाही आश्वस्त केलं. 1990 च्या सुमारास माझं एकही पुस्तक प्रकाशित झालं नव्हतं. मग लिहिलेली पहिलीच कादंबरी ‘अद्भुत’ मासिकाला पाठवून दिली. ‘सोबत’कार ग. वा. बेहरेंनी गुणवत्तेमुळे ती दिवाळी अंकासाठी राखून ठेवली. तसं त्यांनी पत्रही पाठवलं.

वास्तवात बेहरेंनीच पुस्तक काढलं. आयुष्यात एखादं पुस्तक आलं तरी पुष्कळ अशी अल्पतृप्ती अपेक्षिणाऱया माझ्यासाठी तो शुभारंभ होता. पुण्याच्या ‘मसाप’नं त्यांच्या दिवाळी अंकात तत्कालीन आश्वासक दहा लेखकांच्या कथा आणि माहिती छापली होती त्यात मीही होतो. साहित्य संमेलनानिमित्त एका दैनिकाच्या रविवार पुरवणीत रविप्रकाश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या उद्याच्या लेखकांवरच्या लेखातही माझा समावेश होता. त्यावेळी छापलेला फोटो ही माझी पहिली जाहीर प्रसिद्धी. मामांनी सुखावून दिलेले पाचशे रुपये मी जपून ठेवले आणि त्यामागच्या भावनाही. ‘‘अरे, उभ्या मातुल घराण्यात तुझाच फोटो छापून आला’’ असं अण्णा म्हणाले. ज्या पार्ल्यात आयुष्याची खूप वर्षे गेली होती तिथेच स्थायिक व्हायला मिळावं हे एकमेव स्वप्न माझं. त्याची पूर्तताही केली ती अण्णा, आई आणि भाऊ सुदर्शन रिसबूड यांनी. जबाबदारीमुक्त अविवाहित राहण्याच्या स्वयंनिर्णयाला पुरेसं दोन खोल्यांचं घर. पार्ल्याच्या अंतर्भागातली शांतता, झाडी, आदर्शवत शेजार. माझ्यावर मामांचा म्हणजेच अण्णा साठे यांचा प्रभाव चिरस्थायी आहे.

ते म्हणायचे, ‘‘शेतकऱयांनी कसलं तरी सारं शेतं त्यांचं नसतंच. पाखरा-फुलपाखरांच्या थव्यांनीच ते पीक जिवंत होतं.’’ माझ्यासाठी तो थवा माणसांचा, गरजूंचा होता. जे गरजू इथे राहतील घर त्यांचंही असेल असं अलिखित वास्तव माझ्या आस्थेवाईक घरानं जपलं. कित्येक पत्रकार, चित्रकार त्यांच्या उमेदवारीच्या काळात इथे सहवासी होऊन गेले. भविष्यात ते दैनिकाचे संपादक, चॅनलचे उच्चपदस्थ झाले याचा मला वाटणारा आनंद लेखनानंदाइतकाच निर्भेळ आणि अनुपम. ज्या घरात, ज्या टेबलापुढे बसून मी लिहितो त्या वास्तू आणि वस्तूइतकीच मला कृतज्ञता वाटते ती फोनविषयी. कारण प्रत्येक आत्मकथा, नायक मुखातून मला या फोननं ऐकवली. मग मी ती लिहिली. या श्रवण लेखनाच्या सृजनामुळे दरवेळी मी नवं आयुष्य जगलो. म्हणूनच ‘मनश्री’ लिहिताना पहाटे जाग आल्यावर आपण आंधळे असल्याचा भास मला अंधारात व्हायचा. अशा समरसतेमुळेच त्यांच्या आत्मकथा जिवंत झाल्या आणि वाचकांनाही तीच प्रचीती येत गेली.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. काही कामासाठी वडावाला एका कंपनीत गेले होते. शॉप इन्चार्ज कुणी अमराठी अधिकारी होता. त्यांच्या केबिनमध्ये वडावाला गेले तेव्हा ते कुणा तरुण कामगाराला रागवत होते. खालमानेनं तो अपोलॉजी लेटर लिहीत होता. बाजूला पुस्तक पडलं होतं. अधिकाऱयांच्या खरडपट्टीमुळे समजलं की, मशिनरीच्या धबडग्यात कोपरा पकडून कामाच्या वेळेत तो पुस्तक वाचत होता. बाजूला अधिकारी आल्याचंही त्याला भान नव्हतं. बेजबाबदार वर्तनाबद्दलचं त्याचं मराठीतलं अपोलॉजी लेटर स्वीकारून तरुणाची पाठवणी केल्यावर वडावालांना अधिकारी म्हणाले, ‘प्लीज रीड ऍण्ड एक्सप्लेन व्हॉट ही हॅज रिटन’ पत्र वाचून वडावालांनी अर्थ सांगितला, पण विनंती केली की, त्या तरुणाला एकवार माफ करावं. हे पुस्तक वडावालांचं ‘मी नंदा’ होतं. दिवंगत दलित साहित्यिक केशव मेश्राम मुलीच्या वयाच्या नंदा मांढरे या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडतात, जातीभेदामुळे गहजब होतो. तेरा वर्षांच्या संसारानंतर विधवा झालेल्या नंदानं सांगितलेली ही अनघड प्रेमाची कहाणी वाचताना स्थळकाळाचा विसर पडणं ही चूक त्या तरुणाची नव्हती, पुस्तकाची होती. ‘ओके. आय वोण्ट फॉरवर्ड दी लेटर’ असं म्हणत त्या अधिकाऱयानं ते पत्र फाडून टाकलं होतं. ‘‘वाचताना भान हरपायला लावणारं लेखन करण्यासाठी पुढचा जन्मही आत्मकथाकाराचाच यावा, याच घरात यावा’’ असं सांगताना वडावाला पुस्तीही जोडतात, ‘‘मात्र तेव्हा मायमराठीचाही पुनर्जन्म झालेल हवा, दैन्य संपून ती समृद्ध झालेली दिसायला हवी.’’

‘‘संगीताच्या अनुपस्थितीतही मैफलीतला आत्मानंद आणि मनःस्वास्थ्य हरक्षणी देत राहणारा कोणताही स्थायी निवारा म्हणजे घर’’ असं म्हणणाऱया सुमेध वडावालांच्या घरातून गप्पांची मैफल संपवून निघाले तेव्हा रंगलेल्या मैफलीतले सूर सोबतीला यावेत तशा त्यांनी लिहिलेल्या आत्मकथांमधल्या अनेक व्यक्तिरेखा माझ्या सोबतीला होत्या.