लढवय्यी लेखिका

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

वंदना अत्रे… त्यांची लेखणी जीवनाच्या लढाईतूनच झळाळून उठली आहे..

२००८ ते २०१७… पहिल्यांदा बिजांड कोशाचा कॅन्सर, त्याच्याशी सामना जिंकता जिंकता आतडय़ाचा कॅन्सर आणि त्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर.. वंदना अत्रेनं गेल्या दहा वर्षांत तीनवेळा कॅन्सरशी झुंज दिली. ‘आता हे उगाच मुलाखतीतून हायलाईट करू नकोस हं’ असंही ती म्हणाली. कारण मुळात तिची असलेली सकारात्मक विचारधारा. ‘या आजारपणाचा बागुलबुवा करण्यापेक्षा या आजारपणानं मला लेखिका बनवलं हे जास्त महत्त्वाचं आहे’ हेच तिचं म्हणणं. वंदनानं २८ वर्षे ‘गावकरी’ दैनिकात काम केलं. मेहता पब्लिकेशनकडे पुस्तक संपादनाचं काम ती करत होती. आई कमल अभ्यंकर लेखिका, बहीण रोहिणी चित्रकलेत पारंगत, वडिलांचं प्रचंड इंग्लिश वाचन आणि वंदनाचं व्यक्त होण्याचं माध्यम म्हणजे संगीत. शास्त्रीय संगीतावर तिनं लेखनसुद्धा खूप केलं आहे, पण या सगळ्या लिखाणाला पुस्तकरूप मिळालं नव्हतं कधी.

तिचं पहिलं अनुवादित पुस्तक ‘स्लमडॉग मिलेनियर’. हो, बरोबर. ऑस्कर मिळालेला चित्रपट ज्याच्यावर आधारित होता त्याच ‘स्लमडॉग मिलेनियर’ कादंबरीचा अनुवाद वंदनानं केला आणि मेहता पब्लिकेशननं तो प्रकाशित केला, पण जेव्हा या पुस्तकाचं तिनं काम सुरू केलं तेव्हा ती कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली होती. वंदना सांगत होती तिच्या आयुष्याचा आणि लेखनाचा प्रवास. तिच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण जसजशी समजत गेली, तसतसा माझ्यातल्या सकारात्मकतेला भरभरून श्वास मिळाला. वंदना म्हणाली, ‘माझा जन्म ज्या घरात झाला, तिथे मनात येईल ते बोलण्याची, व्यक्त होण्याची मुभा होती. जे चुकीचं वाटतं ते बदलावं असं वाटणारी मी. सामाजिक प्रश्नांबाबत मी गप्प बसू शकत नाही, पण त्यासाठी आंदोलन वगैरे करणाऱयातलीही मी नाही. बाबा आमटे, अभय बंग यांच्यासारखं भव्यदिव्य कामही मी करू शकत नाही. मग मी विचार केला की, मी काय करू शकते, तर माझ्या लेखणीतून न पटणाऱया गोष्टींच्या विरोधात वाचा नक्कीच फोडू शकते. जर्नालिझमचा कोर्स मी याच विचारातून केला आणि त्याचमुळे लिहायलासुद्धा लागले. विशेषतः वर्तमानपत्रांतून. ..आणि आजारपणानं मला खऱया अर्थानं लेखक केलं. या लिखाणामुळे एक झालं, कॅन्सरशी लढा देताना होणारा त्रास, त्याचे परिणाम याबद्दल विचार करायला, पुस्तक लिहिताना मला वेळच मिळत नव्हता.’

वंदनाशी बोलताना जाणवत होतं, तिच्या लिखाणातून ती जी सकारात्मकता लोकांपर्यंत आणू इच्छिते, तशीच सकारात्मकता या मुलाखतीतून साकारणार आहे. एकापाठोपाठ झालेल्या तीन कॅन्सरशी लढाई करताना तिचं वास्तव्य हॉस्पिटलमध्ये इतकं होतं की, गेल्या दहा वर्षांत तिचं ते दुसरं घरच बनलं आणि लेखणीचं अस्त्र करून वंदनानं त्या कॅन्सरशी झुंज दिली. त्यावेळी माझ्या नशिबानं भीष्मराज बाम सर भेटले.. ते म्हणाले, आपल्या मनात येणाऱया विचारांची निवड करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला असतं. विचार म्हणजे बीज असतं. जो विचार आपण स्वीकारतो, तो मनात रुजतो. मग मूळ धरतो आणि फोफावतो. त्यातूनच आपला सकारात्मक किंवा नकारात्मक स्वभाव बनतो आणि जसा आपला स्वभाव असतो तसंच आयुष्य आपल्या वाटय़ाला येतं. भीष्मराज बाम सरांनी मला हेच सांगितलं की, या आजारात दोनच गोष्टी करायला हव्यात. पहिली म्हणजे उपचार घेणं आणि दुसरी म्हणजे मन खंबीर करणं. रोज सकाळी सहा वाजता हा रिटायर्ड आयपीएस ऑफिसर मला प्राणायाम आणि योगासने शिकवायला माझ्या घरी यायचा. माझ्या मनाला कॅन्सरशी झुंज द्यायला सज्ज करण्यासाठीच ते यायचे आणि म्हणायचे, ‘कॅन्सर तुझ्या आयुष्यातला फक्त एक टप्पा आहे. ते तुझं आयुष्य नाही. अशा टप्प्यांना पार पाडायची क्षमता तुझ्यातच नाही, प्रत्येकात असते. हनुमंतानं संजीवनी आणण्यासाठी संपूर्ण पर्वत उचलला होता. तो आपला पूर्वज. कुणालाही अशक्य वाटणारी ही घटना त्याच्या मानसिक शक्तीच्या बळावर त्यानं साधली. पर्वतालाही हलवण्याची हीच शक्ती देवानं निवडून निवडून काही जणांनाच फक्त दिलेली आहे असं नाही, तर ती प्रत्येकातच असते. कॅन्सरच्या निमित्तानं ही शक्ती जागृत करण्याची आणि आजमावण्याची संधी तुला मिळाली आहे. ती संधी वापरायची की सोडायची ते तूच ठरव.’

‘मी करू शकते’ हा मग माझ्या आयुष्याचा मंत्रच बनला. मी काही विचारवंत किंवा फार मोठी लेखिका नाही. मला आनंद वाटतो म्हणून लिहिते मी. ‘तिबेटच्या वाटेवर’ हे पुस्तक मला लिहावंसं वाटलं. कारण साब्रिएची सकारात्मकता आणि तिचं समाजासाठी असलेलं योगदान मला स्वतःला खूप प्रेरित करून गेलं. मग ते माझ्या लेखणीतून लोकांपर्यंत पोहोचवावंसं वाटलं. पुस्तक प्रकाशनाला साब्रिए स्वतः हजर होती आणि तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण होता. हिंदुस्थानी भाषेत पहिल्यांदा मराठीत हे पुस्तक अनुवादित झालं आणि मी ते अनुवादित केलं ही माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ‘पाऊल पुढे पडताना’ हे माझं स्वतंत्र पुस्तक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱया देशभरातल्या अकरा स्त्रियांबद्दल आहे. त्यांची क्षेत्रं वेगवेगळी आहेत, पण जगण्याचा उद्देश एकच आहे सामाजिक उन्नती!’

वेश्या पुनर्वसनाचं, पर्यावरणाचं, कच्छच्या रणात भूकंपग्रस्तांच्या मदतीचं काम करणाऱया ११ स्त्रियांच्या मुलाखती तिनं घेतल्या. ज्यांच्यासाठी हे काम केलं गेलं, त्यांच्या आयुष्यावर या कामाचा काय परिणाम झाला हेही तिने जाणून घेतलं. पुण्यात शाश्वती सर्जनशील ‘स्त्री अभ्यास केंद्र कार्यरत होतं. डॉक्टर अरुणा ढेरे त्याच्या संचालिका होत्या. त्यांच्याकडून मला फेलोशिप मिळाली. त्यामुळे या स्त्रियांना त्या त्या ठिकाणी जाऊन भेटणं, तिथे राहून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याविषयीही लिहिणं हे सगळंच सोपं गेलं.’ काम करण्याची इच्छा असते, पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी त्या कार्य करणाऱया व्यक्तीच्या पाठीशी भरभक्कमपणे जेव्हा एखादी संस्था उभी राहते, तेव्हा ते कार्य पूर्णत्वाला जाऊ शकतं याचं सुखद उदाहरण म्हणजे वंदनाला ‘शाश्वती सर्जनशील स्त्री अभ्यास केंद्रा’ची मिळालेली फेलोशिप.

वंदनाशी बोलताना सतत जाणवत होता तो तिचा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा स्वभाव. कौतुक करून घेण्याची आणि ‘मी केलं’ म्हणण्याची वृत्ती जागोजागी दिसत असताना आपलं कर्तृत्व फार काही मोठं नाही आणि आपल्यापेक्षा खूप काम केलेली अनेक मोठी माणसं आहेत याची सतत जाणीव असणारी वंदना मला निश्चितच वेगळी वाटली. आपल्या मर्यादांना आव्हान देत स्वतःच्या क्षमतेचा कस पारखून बघण्याची वंदनाची वृत्ती छोटय़ा-छोटय़ा अडचणींना घाबरून जगणंच नाकारणाऱया लोकांच्या मनात जिद्दीचा अंकुर रुजवून जाईल हे निश्चित. ‘दिवसाची सुरुवात करताना प्राणायाम करून स्वतःच्या शरीराशी बोलावं, त्याच्यात डोकावून पाहावं, दिवसभराचं उद्दिष्ट ठरवावं आणि मग त्या ठरवलेल्या मार्गावरून दिवसाची रूपरेषा आखावी ही शिस्त, हा नियमितपणा या तीन कॅन्सरने मला दिला’ असं म्हणणारी वंदना. ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘सहा संशयित’, ‘कॅन्सर रोखूया’, ‘तिबेटच्या वाटेवर’, ‘विजयाचे मानसशास्त्र’ अशी सात अनुवादित आणि ‘पाऊल पुढे पडताना’, ‘आशेचा अंकुर’ अशी तीन पुस्तकं लिहिण्याची सुरुवात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर करणारी वंदना अत्रे… किती सहजतेने ती सांगत होती.

‘जेव्हा पहिल्यांदा कॅन्सर झाला तेव्हा जंगलात हरवलेल्या माणसासारखी अवस्था झाली होती माझी.. दिशाहीन, पण दुसऱयांदा आणि तिसऱयांदा मला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा मला माहिती होती होणाऱया त्रासाची, कल्पना होती परिणामांची आणि त्या वेळी मनाचा तोल ढळू न देता पुस्तकांच्या लिखाणात स्वतःला गुंतवून ठेवायचं हेही माहीत होतं मला. पहिल्या कॅन्सरचा अनुभव दुसऱया आणि तिसऱया कॅन्सरचा दिवा असल्यासारखा माझ्या सोबत होता आणि माझ्या आयुष्याला प्रकाश देत होता.’

मुळात कॅन्सर झाल्यावर हॉस्पिटलमध्ये तिच्या लिखाणाला सुरुवात झाली, पण त्यावेळी तिच्या घरचे लोक ‘पहिल्यांदा बरी हो आणि मग काय ते कर’ किंवा ‘कॅन्सर झालाय आणि हे काय भलतंच पुस्तक लिखाणाचं खूळ घेतलं आहेस तू?’ असं म्हणाले नाहीत. कुठलीही अडवणूक झाली नाही. नवरा, मुलं सागर आणि चैतन्य आणि सासूसासऱयांकडूनही. कारण त्यांनी हे जाणलं होतं की, तिला तिच्या लेखनातूनच आनंद मिळणार आहे. ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना त्यांना मानसिक आधार देण्यासाठी, स्वतःचे अनुभव सांगायला आणि त्यांना मानसिकरीत्या सक्षम करायला वंदना कधी हॉस्पिटलमध्ये जाते, तर कधी रुग्णांच्या घरी जाते. तिच्या लिखाणातून तिला भेटलेल्या सगळ्या व्यक्तिरेखा त्यांच्या कामाच्या ठिकाणांसह तिच्या घराचा एक अविभाज्य हिस्सा बनल्या आहेत असं ती मानते. त्या भव्यदिव्य व्यक्तीच्या सान्निध्यात स्वतःच्या विचारांना घासून पुसून लख्ख करत मरणाच्या दारात जगण्याची सुरुवात तिनं केली. म्हणूनच थक्क होऊन नुसतं बघत राहण्यापेक्षा तिच्यासारखंच नव्यानं जगण्याची ऊर्मी स्वाभाविकच मनात निर्माण झाली.