धमाल दिवाना शम्मी कपूर

  • धनंजय कुलकर्णी

हिंदुस्थानी सिनेमात ‘बंडखोरीच्या’ संस्थानाचा अनभिषिक्त सम्राट होता शम्मी कपूर! स्वातंत्र्यानंतर रुपेरी पडद्यावर रुजू झालेल्या सदाबहार त्रिकुटाने आपापल्या स्वतंत्र शैलीने रसिकांवर फक्त मोहिनीच घातली नाही, तर स्वतंत्र गटवार विभागणीदेखील केली, पण या (दिलीप, राज व देव) तिघांपेक्षा वेगळी स्वतःची शैली विकसित करून आणि यशस्वी करवून दाखवत एक नवीन ‘ट्रेंड’ निर्माण करण्याचं श्रेय शम्मीकडे जातं. तोवर सिनेमात आदर्शवत असलेल्या संयत प्रणयाची मात्रा शम्मीने पार चोळामोळा करून फेकून दिली.

सिनेमाच्या चौकटीत बसणारी नायकाची सोज्वळ, स्त्रीदाक्षिण्य सांभाळणारा, हळुवारपणे फुलविणारा ही प्रतिमाच मोडीत काढली. कपूर खानदानातील इतरांप्रमाणेच तो राजबिंडा होता. त्याच्या नजरेत नयिकांना घायाळ करणारा एक ‘किलिंग लूक’ होता. सिनेमात तो नायिकांना घुसळून टाकत असे, छळ छळ छळत् असे, प्रचंड त्रास देत असे. शम्मीच्या आधीच्या म्हणजे १९५७ पूर्वीच्या भूमिका पाहिल्या तर आज हसू येतं. त्याच्यातील ‘ऑटिट्युड’ किंवा ‘एक्स फॅक्टर’ ओळखला नासीर हुसेन या जोहरीने! त्या काळात हॉलीवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘एल्विस प्रिस्ले’च्या रॉक ऍण्ड रोल’चा मोठा बोलबाला होता. त्याच्या जादुई हालचालीने सारा युवावर्ग नादावला होता. तसेच ‘रिबेल विदाऊट अ कॉझ’ या हॉलीवूड पटाचा नायक जेम्स डीन याचाही युवा मनावर चांगलाच प्रभाव होता. या दोघांच्या पाश्चात्य शैलीला शम्मीने हिंदुस्थानी रूपात सादर करण्याचा चंग बांधला. नासीर हुसेनच्या १९५७ च्या ‘तुमसा नही देखा’ या सिनेमाच्या वेळी त्याने कात टाकली. मिशा काढून टाकल्या, केसांची स्टाईल बदलून प्रिस्लेप्रमाणे कपाळावर बट आणली. (त्या काळी या हेअर स्टाईलला ‘डक टेल’ म्हणून संबोधले जाई.) रंगीबेरंगी स्वेटर, जाकीट, गळ्यात मफलर अडकवून ‘कम्प्लिट मेक ओव्हर’ करीत स्वारी हुंगेगिरी करत हिंडू लागली. नायिकेला करकचून मिठी मारत, तिच्या कुल्ल्यावर चापट्या मारत, तिच्याशी धसमुसळेपणाने वागत त्याने प्रेमाची भाषाच बदलवून टाकली. नासीर हुसेनच्या ‘तुमसा नही देखा’ला याकरिता ऐतिहासिक महत्त्व आहे की त्याने सिनेमाच्या रोमँटिक पिक्चरची परिभाषा बदलवून टाकली. शम्मीच्या यशात आणखी काही महत्त्वपूर्ण व्यक्तींचा समावेश करायला हवा. म. रफी, ओ.पी. नय्यर, शंकर जयकिशन आणि तारुण्याने मुसमुसलेल्या कोवळ्या नायिका! कित्येक गाजलेल्या नायिकांचा पहिला चित्रपट शम्मीसोबत होता हे विशेष. १९५७ ते १९७१ हा जमाना शम्मीचा होता. शम्मीचं भाग्य थोर. वैजयंती मालापासून हेमा मालिनीपर्यंत हरेक नायिका त्याला लाभल्या. प्रेमाची रुंजी घालत त्याने या सर्व हसीन बालांना नाच नाच नाचवलं. अभिनय वगैरे हा सर्व प्रकार त्याच्याकरिता ‘आऊट ऑफ सिलॅबस’ होता. उद्या १४ ऑगस्ट शम्मीचा स्मृतीदिन (निधन १४ ऑगस्ट २०११) त्यानिमित्ताने त्याचे स्मरण!

‘तुमसा नही देखा’तील रफीच्या बेधुंद स्वराने आणि शम्मीच्या धमाल अदाकारीने रसिक प्रेक्षक वेडावून गेले. ‘यु तो हमने लाख हंसी देखे है तुमसा नही देखा’, ‘छुपने वाले सामने आ’, ‘सरपर टोपी लाल हाथ में रेशम का रुमाल ओ तेरा क्या कहना’, ‘आये हैं दूर से मिलने हुजूर से’ या गाण्यांनी धिंगाणा घातला. शम्मीचा यशाचा ‘फार्म्युला’ नक्की झाला. या पाठोपाठ आला ‘दिल देके देखो’ संगीत होतं उषा खन्नाचं! यातील ‘हम और तुम और ये समा क्या नशा नशा सा हैं ’ या गीतात रफीचा स्वर काय धुंद लागला होता. ‘बडेही दिल के काले’, ‘प्यार कि कसम ही न देखो ऐसे प्यार से’, ‘यार चुलबुला हैं’ ही ‘युगल गीते’देखील गाजली. १९६१ साली सुबोध मुखर्जीचा ‘जंगली’ आला. हा सिनेमादेखील ट्रेंड सेटर होता. याच्या यशामुळेच हिंदी सिनेमा सप्तरंगात न्हाऊ लागला. हा काही पहिला रंगीत सिनेमा नव्हता, पण रंगीतपणाने बदलणारी यशाची आर्थिक गणिते निर्मात्यांना भुलवू लागली. त्या वर्षीचं ‘बिनाका टॉप’चं ‘अहसान तेरा होगा मुझपर’ याच सिनेमातलं होतं. या गाण्यात शम्मीने खूप चांगला भावोत्कट अभिनय केला हे मान्य करायलाच हवं. त्याने ‘याहू’ ही दिलेली आरोळी आसमंत दणाणून गेली. (हाच याहू शब्द पुढे internetच्या युगात परवलीचा शब्द बनला. हे गीत पुढे शम्मीचे ‘सिग्नेचर ट्यून ठरले.) त्याची स्टाईल, गाण्यातील अदा अजब होती. यातील ‘दिन सारा गुजरा तेरे अंगना’ या गीतात ओठात गुलाबाचे फूल घेऊन टाळ्या पिटण्याची त्याची अदाकारी खासच होती. ‘आय्यया करू मैं क्या सुकू सुकू’च्या नृत्यात त्याने घेतलेल्या स्टेप्स अजब होत्या. १९६२ साली लेख टंडन यांचा ‘प्रोफेसर’ हा सिनेमा आला. यात शम्मीने अदा केलेल्या प्रोफेसर आणि प्रेमवीर या दोन्ही भूमिकांत रंग भरले. सोबत शंकर जयकिशनच सुरीलं संगीत… ‘ऐ गुलबदन ऐ गुलबदन फुलोंकी महक’, ‘खुली पलक में झुटा गुस्सा बंद पलक में प्यार’, ‘मैं चली मैं चली पिछे पिछे जहां’ आणि सर्वांगसुंदर असे ‘आवाज दे के हमे तुम बुलावो’ सिनेमा सुपरहिट ठरला. राज-दिलीप-देव या सदाबहार त्रिकुटांच्या राज्यात त्याने स्वतःची वेगळी इमेज बनवून तरुणाईला आपल्याकडे खेचून घेतलं. खाली गालीचा असो, दगड असो वा हिरवळ असो, याचं मोकळं अंग त्यावर मोकळेपणाने पसरलेलं, एक पाय आभाळाकडे, डोक्याची टोपी डोळ्यावर आलेली, हात कधी भूमीवर तर कधी डोक्याच्या मागे सोबतीला प्रचंड आडदांडपणा, धसमुसळेपणा! या स्टाइलमध्ये ऑक्टिंग करत त्याने कश्मीर कि कली, तिसरी मंझील, ब्रह्मचारी, जानवर, प्रिन्स, पगला कही का, लाट साहब, ऍन इव्हिनिंग इन पॅरिस, दिल तेरा दिवाना, राजकुमार, बद्तमीज या खास शम्मी स्पेशल सिनेमाची सुपरहिट मालिका सुरू झाली. शम्मीला अभिनयाशी काही देणंघेणं नसायचं असा आरोप सर्रास केला जातो, पण तो सर्वस्वी खरा नाही. ‘पगला कही का’मध्ये मित्राला खुनाच्या आरोपातून सोडवण्यासाठी स्वतःवर आळ ओढवून घेणारा आणि स्वतःची शिक्षा टळावी म्हणून वेडाचं सोंग घेऊन ‘मेरे भैस को डंडा क्यू मारा’ असले खुळचट गाणे गाणारा, पुढे प्रेयसीनं प्रेमभंग केल्यावर खरोखरच वेडा झालेला ही अभिनयाची भावस्पर्शी रूपं शम्मीने दाखवून दिली. तरीही आजही शम्मी आठवतो तो त्याच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांमुळे!

ये चॉंदसा रोशन चेहरा, हैं दुनिया उसी की जमाना उसीका, इशारो इशारो में दिल लेने वालो, दिवाना हुवा बादल (कश्मीर कि कली), बार बार देखो हजार बार देखो (चायना टाऊन), इस रंग बदलती दुनिया में (राजकुमार), गोविंदा आला रे आला, हुस्न चला कुछ ऐसी चाल (ब्लफ मास्टर), तुमने मुझे देखा, दिवाना मुझसा नही, ओ हसीना जुल्फो वाली, ओ मेरे सोना रे सोना रे सोना, आजा आजा में हूं प्यार तेरा (तिसरी मंझील), जाने मेरा दिल किसे ढूंढ रहा हैं, सवेरे वाली गाडी से चले (लाट साहब), लाल छडी मैदान खडी, मेरी मुहोब्बत जवा रहेगी (जानवर), दिल के झरोखो मे तुझको बिठाकर, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे (ब्रह्मचारी), दिल उसे दो जो जान दे दे (अंदाज), अकेले अकेले कहॉं जा रहे हो, रात के हमसफर, आसमान से आय फरिश्ता, होगा तुमसे कल भी सामना, दिवाने का नाम तो पूछो (ऍन इव्हिनिंग इन पॅरिस), बदन पे सितारे लपेटे हुये (प्रिन्स), झुमता मौसम मस्त महिना (उजाला), तुम मुझे यूं भूला न पाओगे (पगला कही का), तेरी नीली नीली ऑंखोके दिल पे तीर चल गये (जाने अनजाने), हसीन हो तुम खुदा नही हो (बदतमीज ), नजर बचाकर चले गये, मुझे कितना प्यार ही तुमसे (दिल तेरा दिवाना).

आज शम्मीच्या स्मृतीदिनी ही त्याची गाणी आठवून आपल्याला आणखी बेदम बेचैन करतात. सत्तरच्या दशकात राजेशच्या आगमनानंतर सारेच चित्र बदलले. शम्मीचा आकारदेखील डेरेदार झाला. मनोरंजन, बंडलबाज वगैरे चित्रपटांचं दिग्दर्शन करून पाहिलं, पण हे आपलं क्षेत्र नव्हे म्हणून पुन्हा स्वारी चरित्र भूमिकांकडे वळली. विधाता, हिरो, अरमान, जमीर, आहिस्ता आहिस्ता, परवरीश, प्रेमरोग या चित्रपटांतील त्याचा अभिनय सराहनीय होता. शम्मी कपूरची नक्कल करत विश्वजित,जॉय मुखर्जी यशस्वी ठरले. जंपिंग जॅक जितेन्द्रवर त्याचा प्रभाव होता. राजीव कपूरने त्याचा पहिला सिनेमा कम्प्लिट शम्मी स्टाइलमध्ये केला होता, पण शम्मी एकमेवाद्वितीय होता. त्याची नक्कल कुणालाच जमली नाही. कुणाला जमणार नाही… म्हणूनच त्याला सलाम!