‘येह कौन चित्रकार है’… चित्रातून नाट्यानुभव

>> क्षितिज झारापकर

कोणतीही कला ही जाणिवांची अभिव्यक्ती असते. कलाकार त्याच्या जाणिवांना व्यक्त करण्यासाठी त्याला अवगत असलेल्या कलेला माध्यम बनवून व्यक्त होत असतो. हे व्यक्त होणं हा त्या कलाकाराचा आविष्कार असतो. गायक आपल्या मूडप्रमाणे एखाद्या रागाची निवड करून व्यक्त होतो. शिल्पकाराच्या शिल्पातली भावुकता त्याच्या मानसिक परिस्थितीवरून दिसते अणि चित्रकाराने वापरलेल्या छटा त्याच्या मनःस्थितीची ओळख आपल्याला देतात, पण चित्रकाराच्या चित्रात जी अभिव्यक्ती असते ती केवळ त्या चित्रकाराच्या मनःस्थितीशी जुळलेली नसते तर ते चित्र पहणाऱया दर्शकाच्याही मनःस्थितीवर अवलंबून असते. म्हणून तर एखाद्या पेन्टरचं पेन्टिंग पाहताना दोन व्यक्तिंना आपापल्या मनःस्थितीप्रमाणे दोन वेगवेगळय़ा प्रकारच्या अनुभूती येऊ शकतात. जर एका कलाकाराच्या अभिव्यक्तीचा अनुभव घेणारा दुसरा कलाकार असेल तर? या प्रश्नाचं उत्तर सुषमा देशपांडे लिखित अणि आविष्कार या प्रायोगिक नाटय़संस्थेद्वारा निर्मित ‘ये कौन चित्रकार है,’ या नाटकातून मिळतं.

‘ये कौन चित्रकार है’ हे नाटक डॉ. सुधीर पटवर्धन यांच्या चित्रामधून लेखिका अणि दिग्दर्शिका सुषमा देशपांडे यांना दिसलेल्या नाटय़ावर बेतलेलं आहे. चित्रांमध्ये बघणाऱयाला नाटय़ दिसावं हा अगदी मूलभूत हेतू असणं स्वाभविक आहे, पण एका नाटय़कर्मीने ते नाटय़ एका खऱयाखुऱया नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडल्याचं हे बहुधा पहिलंचं उदाहरण आहे. ‘ये कौन चित्रकार है’ सुषमा देशपांडे आपल्याला आधी पटवर्धनांचं चित्र दाखवतात अणि मग त्यातील त्यांना दिसलेलं नाटय़ दाखवतात. एका अर्थाने मग ‘ये कौन चित्रकार है’ हे डॉ. सुधीर पटवर्धनांच्या चित्रातून सुषमा देशपांडेंना दिसलेलं नाटय़ असा प्रयोग होतो. या प्रयोगात मग पटवर्धनांच्या चित्रकलेच्या अणि सुषमा देशपांडेंना त्यात दिसलेल्या नाटय़ाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला प्रेक्षक म्हणून दिसतात. एका लोप पावत चाललेल्या इराण्याच्या हॉटेलच्या मालकाच्या त्या हॉटेलमधल्यासोबतच्या संवादातून तत्कालीन परिस्थितीचा आढावाघेत ‘ये कौन चित्रकार है’ या नाटकाची सुरुवात होते. इथे दिग्दर्शिका सुषमा देशपांडे ज्यूक बॉक्सवर वाजणाऱया जुन्या गाण्यांच्या सहाय्याने माहोल छान उभा करतात. इराण्याच्या हॉटेलमधून सुरू होणारं ‘ये कौन चित्रकार है’ पुढे कामगार चळवळ, मुंबईतल्या गिरण्यांचं राजकारण असे सत्तरीच्या दशकातल्या मुंबईतल्या जीवनाचं नाटय़ आपल्यासमोर मांडू लागतं. या सगळ्यात आपण नकळतपणे गुरफटत जातो हा सुषमा देशपांडे यांच्या दिग्दर्शनाचा विजय आहे.

डॉ. पटवर्धन यांच्या चित्रांमधून त्यांना दिसणारी कॅरेक्टर्स सुषमा देशपांडेंनी वयाच्या क्रोनॉलॉजीप्रमाणे मांडली आहेत. त्यामुळे ‘ये कौन चित्रकार है’ हे नाटक नुसतं वेगवेगळ्या चित्रांतील नाटय़ाचं प्रहसनात्मक प्रेझेन्टेशन न होता चित्रकाराच्या कार्यकालाचा एक चढता आलेख बनतं. नाटक म्हणून पाहताना हे होणं फार गरजेचं होतं अणि ते लेखिका सुषमा देशपांडे यांनी धूर्तपणे साध्य केलेले आहे.

अशा प्रकारच्या नाटय़ सादरीकरणाला चांगल्या कलाकारांची गरज असते. आविष्कार ही संस्था सातत्याने नावीन आणि ताकदीचे कलाकार मराठी रंगभूमीला देत आलीये. आविष्कार ही रंगकर्मीची फॅक्टरी आहे. ‘ये कौन चित्रकार है’ या नाटकात आविष्कारचे वीस तरुण आणि चिरतरुण कलाकार आहेत. नवनीत येसरे, राजन जोशी, पराग सारंग, राहुल शेंडे, मंगेश क्षीरसागर, सुदेश बारशिंगे, मुकुंद मोरे, संतोष पाटील, सुशांत कुंभार, आरुष कुमार अणि स्त्री कलाकार शिल्पा साने, गीता पांचाळ आणि श्वेता शिंदे या सगळय़ांनी जाणत्या अभिनयाचा उत्तम आविष्कार दाखवलाय. यांच्या जोडीला आविष्कारचे सर्वेसर्वा अरुण काकडे हे चिरतरुण आहेतच. सगळय़ांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची करामत ‘ये कौन चित्रकार है’ या नाटकात करून दाखवलीये.

‘ये कौन चित्रकार है’मध्ये ब्लॅक आऊट फार कमी वापरलेत. वेगवेगळ्या चित्रांवर आधारित छोटय़ा- छोटय़ा गोष्टींवर बेतलेल्या नाटकात असं करणं खूप कठीण आहे. पण इथे महत्त्वाचं ठरतं ते नाटकाचं नेपथ्य अणि प्रकाश योजना. एका विचारातून दुसऱया विचारात जाण्यासाठी दिग्दर्शिका या दोन तंत्रांची मदत घेते अणि ते प्रभावी ठरतं. विश्वास कणेकरांचं नेपथ्य अणि रवी-रसिक यांची प्रकाश योजना ‘ये कौन चित्रकार है’ला फारचं पूरक आहे. डॉ. सुधीर पटर्वधन यांचीचं चित्र दृष्यबदल करण्यासाठी वपरण्याची क्लृप्ती फॅण्टॅस्टिक आहे. रवी-रसिक यांनी प्रकाशाचा खेळ करत खूप सुचकतेने बदल दाखवलेत.

नितीन कायरकर यांनी पार्श्वसंगीतही तितकेच प्रभावी दिलय. प्रत्येक दृष्य अधिक परिणामकारक होण्यात याची खूप मदत होते. विषेशतः देवदत्त साबळे यांनी केलेला अणि दस्तुरखुद्द अरुण काकडे यांनी सादर केलेला लोअर परळवरील पोवाडा खूपचं छान झालाय. शरद विचारे यांनी रंगभूषा कल्पकतेने क़्लेली आहे. ‘ये कौन चित्रकार है’ या नाटकात सगळे कलाकार वेगवेगळ्या वयोगटातील अनेक भूमिका साकारतात. इथे रंगभूषा पटकन बदलण्याची आवश्यकता असते. ही गरज इथे समर्पकरित्या पूर्ण केली गेली आहे.

संकल्पनेतचं ‘ये कौन चित्रकार है’ हे नाटक उजवं ठरतं. सुषमा देशपांडे यांना ही कल्पना सुचली हेचं खरं तर मोठं आहे. अशी नाटक सादर करत अविष्कार या संस्थेने मराठी रंगभूमीला समृद्ध करण्याचा कित्येक वर्षांपासून घेतलेला वसा कायम ठेवलाय.

दर्जा: ३ स्टार
नाटक: येह कौन चित्रकार है
निर्मिती: आविष्कार
संकल्पना, लेखन, दिग्दर्शन: सुषमा देशपांडे
रंगभूषा: शरद विचारे
पोवाडा: देवदत्त साबळे
पार्श्वसंगीत: नितीन कायरकर
नेपथ्य: विश्वास कणेकर
रंगमचं व्यवस्था: सीताराम कुंभार
निर्मिती व सूत्रधार: अरुण काकडे
कलाकार: शिल्पा साने, गीता पांचाळ, श्वेता शिंदे, नवनीत येसरे, राजन जोशी, मंगेश क्षिरसागर, पराग सारंग