व्यसनमुक्तीसाठी अवतरले यमराज

सामना प्रतिनिधी । पुणे

नववर्षाच्या सुरुवातीला दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या… मद्यपान म्हणजे आयुष्याची धूळधाण… दारू पिऊ नका, आयुष्य आताच संपवू नका, असा संदेश देत चक्क यमराज रस्त्यावर उतरले आणि पुणेकरांना दुधाचे वाटप करीत ‘दारू नको दूध प्या’ हा संदेश दिला.

डेक्कनजवळील गुडलक चौकात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे ‘दारू नको, दूध प्या’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, राजन चांदेकर, प्रकाश धिडे, प्रमोद शेळके, अनिरुद्ध हळंदे, नितीन चितळे, समीर कुलकर्णी, दत्तात्रय सोनार, प्रवीण वैद्य, प्रा. सुशील गणगणे आदी मान्यवर उपस्थित होते. यमराजच्या भूमिकेत कलाकार संतोष कवडे यांनी सहभाग घेतला.

नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त हिंदुस्थानचे स्वप्न रंगवावे, याकरिता नववर्षाच्या पूर्वसंध्येला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थांनी फलकांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.