भरकटलेल्या मित्रांची भरकटलेली गोष्ट

yangrad movie poster

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्यांनी मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’ हा सिनेमा पाहिला असेल आणि ज्यांनी ‘फँटम’ या बॅनरचे सिनेमे पाहिले असतील त्यांना ‘यंग्राड’बद्दल नक्कीच एक उत्सुकता असेल. भले त्यातले प्रमुख चेहरे माहितीतले नाहीत, फिल्मी वलय असणारे आकर्षक नाहीत, पण ही दोन नावं नक्कीच काहीतरी कचकचीत वेगळं घेऊन येणार असा विश्वास तयार झाला असतो, पण अशाच वेळी नेमका तो सिनेमा अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून बरंच काही द्यायच्या नादात भरकटल्यासारखा होतो आणि सिनेमा साधारण बरा असूनदेखील खूप काही वेगळं शोधणाऱ्या प्रेक्षकांची मात्र निराशा होते.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘यंग्राड’ हा सिनेमा म्हणून तरुणाईवर, तरुणाईतल्या समस्यांवर आणि त्या समस्यांनंतरच्या दिशेवर आधारलेला आहे. तरुण वयात मौजमजा करायला भरपूर पैसेच पाहिजे असतात असं नाही. कुठल्याही स्तरातले सच्चे मित्र एकत्र आले की, कुठल्या परिस्थितीतही आयुष्य भरभरून जगतात. धाडस, बेधडकपणा, काहीतरी वेगळं करायची खुमखुमी, समाजाचे नियम मोडायची बंडखोरी हे या वयात असतंच, पण ते करताना जर कुठे पाऊल निसटलं तर सगळंच उलटू शकतं. परिस्थिती इतकी हाताबाहेर जाऊ शकते की, अंदाजच लावता येणार नाही. मग या तरुण वयातल्या चुका सुधारून एकतर भविष्याला नवी संधी देता येते किंवा भविष्य पूर्णपणे काळोखात लोटलं जाऊ शकतं. याच विषयावर हा सिनेमा बेतलेला आहे. ही चार शाळकरी मित्रांची कथा. आहे त्या परिस्थितीत मजा करत असताना, आयुष्य मनमुराद जगायचा प्रयत्न करत असताना असं काही घडतं की, नकळत्या वयातच त्यांच्यावर कैदेत जायची वेळ येते. बघता बघता त्यांच्याकडे बघायचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो. कोणाचं पेम, कोणाचं कुटुंब, कोणाचं आणखी काय, सगळंच उद्ध्वस्त व्हायला लागतं आणि मग या परिस्थितीला ते चौघे कसे सामोरे जातात, प्रत्येक जण स्वत:साठी मार्ग निवडतो, पण तो नेमका मार्ग काय असतो यावर आधारलेला ‘यंग्राड’ हा सिनेमा.

अभिनयाच्या बाबतीत हा सिनेमा चांगला जमून आलाय. त्या चार मित्रांचा सहज वावर, शशांक शेंडे वगैरे कलावंतांचं छोटय़ा भूमिकेतही असलेलं संवेदनशील योगदान या सगळ्यामुळे सिनेमाला सहजता आली आहे हे नक्कीच. या सिनेमाला खमकी कथा असली तरीही त्या कथेला अनेक फाटे आहेत आणि होतं असं की, त्या फाटय़ांमुळे कथा दिशाहीन होते. पहिला अर्धा भाग बघताना तर राहून राहून ‘सैराट’ या गाजलेल्या सिनेमाचीच आठवण येत राहते. त्याचं तिच्यावरचं पेम, त्याचे वेडेगबाळे पण जीवाला जीव लावणारे मित्र, तिची खास मैत्रीण इत्यादी इत्यादी. ‘सैराट’चा पहिला भाग आणि ‘यंग्राड’चा पहिला भाग यात प्रचंड साम्य आहे. इतकंच नाही, हिरॉईनचं दिसणं, तिचं व्यक्तिमत्त्व यातही अचानक साम्य दिसायला लागतं, तर दुसऱ्या भागात खच्चून नाटय़ भरलंय, पण ते इतकं जास्त झालंय की, त्यामुळे सिनेमावरची पकडच ढिली होऊन जाते आणि या सगळ्यात जी अनेक उपकथानकं आहेत त्या सगळय़ांचे शेवट घडवून आणल्यासारखेच वाटतात. त्यामुळे हा सिनेमा नाटय़मय असला तरी म्हणावा तसा प्रभाव पाडत नाही.

बरं, हिरॉईनचा ट्रक अचानक सुटल्यासारखा वाटतो आणि तो पाहताना वाटतं की, अरे, जर असं घडणार होतं तर त्या ट्रकची गरजच काय होती! दुसरी महत्त्वाची गोष्ट. दिग्दर्शक सखोल अभ्यास करणारा आहे हे ठाऊक असल्यावर सिनेमा पाहणाऱ्याला त्या दिग्दर्शक, लेखकाकडून तशाच सखोल सिनेमा निर्मितीची अपेक्षा असते, पण मुलांच्या विरुद्ध जे आरोप होतात ते इतके बिनबुडाचे आणि ठरवल्यासारखे दिसतात की, उगाच काहीतरी कारण उभं करायचंय म्हणून केलंय असं चित्र निर्माण होतं. त्यात बालसुधारगृहात मुलांना पाठवायला सांगितलं जातं आणि प्रत्यक्षात सर्व गुन्हेगारांना पाठवतात त्याच कोठडीत का पाठवलं जातं. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी मनात शंका निर्माण करतात.

छायांकन चांगलं आहे, गाणी चांगली आहेत आणि नृत्य दिग्दर्शनही देखणं झालंय. म्हणजे सुरुवातीला मित्रांचं जे गाणं आहे, त्यातलं नृत्य खासच लक्षात राहतं, पण असं असताना शेवटाकडे जे नृत्य आणि गाणं आहे ते अजिबात प्रभाव पाडत नाही. तेच जर खमकं असतं तर सिनेमाला किमान एक टोक आलं असतं, पण दुर्दैवाने तसं होत नाही. राग, लोभ, प्रेम, द्वेष, अशा सर्व रसांच्या प्रेमात पाडून ते सगळेच्या सगळे या सिनेमात घुसवायचा प्रयत्न केला नसता आणि एक आखीव दिशा समोर ठेवली असती तर हा सिनेमा नक्कीच खूप प्रभावी ठरला असता यात शंकाच नाही.

 • दर्जा – *
 • सिनेमा – यंग्राड
 • निर्माता – विठ्ठल पाटील, गौतम गुप्ता,
 • गौरव गुप्ता, मधू मंतेना
 • दिग्दर्शक-कथा – मकरंद माने
 • पटकथा – मकरंद माने, शशांक शेंडे,
  अझीझ मदारी
 • संवाद – भूषण पाटील
 • छायांकन – हरी नायर
 • संगीत – हृदय गट्टानी आणि गंधार
 • कलाकार – चैतन्य देवरे, सौरभ पडवी,
  शिव वाघ, जीवन कराळकर, शशांक शेंडे,
  विठ्ठल पाटील,शंतनू गंगाणे, शरद केळकर.