नोकरी मागितली असती तर तुम्ही अर्थमंत्री नसता! यशवंत सिन्हा यांचा अरुण जेटलींवर पलटवार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपनेते, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी नोटाबंदीवरून केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे. मी नोकरी मागितली असती तर तुम्ही अर्थमंत्री झालेच नसता असा पलटवार यशवंत सिन्हा यांनी अर्थमंत्री अरुण जेटलींवर केला आहे.

८० व्या वर्षी यशवंत सिन्हा नोकरीच्या शोधात आहेत. स्वतः अर्थमंत्री असताना काय केले हे सिन्हा विसरले आहेत अशी टीका काल अर्थमंत्री जेटली यांनी केली होती. त्यावर आज सिन्हा म्हणाले, जेटली यांचे विधान खालच्या दर्जाचे आहे. त्याला उत्तर देणे हे माझ्या प्रतिष्ठेला शोभत नाही. जेटली मला ओळखत नाहीत. १२वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही मी आयएएसची नोकरी सोडली आणि राजकारणात प्रवेश केला. २०१४ ला स्वतःहून सक्रिय राजकारणातून मी निवृत्ती घेतली. अनेक वेळा लोकसभेवर निवडून आलो पण जे एकदाही लोकसभा जिंकू शकले नाहीत ते आता माझ्यावर टीका करीत आहेत असा पलटवार सिन्हा यांनी जेटलींवर केला.

अर्थव्यवस्थेशी संबंधित काही गोष्टी असतील तर त्याला अर्थमंत्रीच जबाबदार असतात, त्याला गृहमंत्री जबाबदार असत नाहीत. माझा मुलगा जयंत सिन्हाला माझ्याविरुद्ध बोलायला सांगून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. मीसुद्धा वैयक्तिक टीका करू शकतो, पण मला या जाळ्यात अडकायचे नाही असे सिन्हा यांनी फटकारले.

बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी; पंतप्रधानांनीच उत्तर द्यावे!
अर्थव्यवस्थेसंदर्भात यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केलेले मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. सिन्हा यांच्या मुद्दय़ांनाही जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. अशावेळी पंत्रपधान नरेंद्र मोदी यांनीच पुढे येऊन जनतेला उत्तर दिले पाहिजे. कारण ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी’ अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ अभिनेते भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा हल्ला चढविला आहे. यशवंत सिन्हा विरुद्ध अरुण जेटली असे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे, पण सिन्हा यांचे मुद्दे गंभीर असून पंतप्रधानांनीच आता बोलले पाहिजे असे ते म्हणाले.