दुचाकी चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

>> प्रसाद नायागांवकर, यवतमाळ

दुचाकी चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला गजाआड करून त्यांच्याकडून 21 वाहने जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

परमेश्‍वर नामदेव जंगले (वय – 25, रा. पार्डी, ह. मु. उमरसरा), साईनाथ भारत धुर्वे (वय – 26, रा. पार्डी (न.), ह. मु. यवतमाळ), गजानन विष्णू कुमरे (वय – 19, रा. पार्डी), अजय वामन कुमरे (वय 24, रा. पार्डी (न.)) अशी दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.

उमरसरा येथील तीन फोटो चौकात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी काही जण फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत विचारपूस केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार लाख 50 हजार रुपये किमतीची 21 दुचाकी वाहने जप्त केली.

अवधूतवाडी दोन, लोहारा, घाटंजी, आर्णी, पांढरकवडासह तेलंगणा राज्यातील वानकीडी, आदिलाबाद येथे प्रत्येकी एक दुचाकी चोरीचा गुन्हा नोंद आहे. अशाप्रकारे सात गुन्हे उघडकीस आणण्यात आले.