2017 मध्ये या क्रिकेटर्सचा बोलबाला


सामना ऑनलाईन । मुंबई

यंदाचे वर्ष क्रीडाविश्वातील खेळाडूंच्या विक्रमांनी गाजलं. अनेक खेळाडूंनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीने विक्रमांची शिखरे पादक्रांत केली. चला पाहूयात हिंदुस्थानी खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानात केलेले विक्रम –

indean-womens-cricket-team

२०१७ हे वर्ष हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघासाठी महत्त्वपूर्ण ठरले. आपल्या दिमाखदार कामगिरीने संपूर्ण जगाला त्यांनी आपली दखल घेण्यासाठी भाग पाडले. आयसीसी २०१७ महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास हिंदुस्थानी संघाने पूर्ण करून त्यांनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

mitali-raj-01

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत इतिहास रचला. मिताली राजने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारी महिला फलंदाज होण्याचा मान मिळवला. आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध मितालीने हा रेकॉर्ड केला होता. मितालीने एकदिवसीय कारकिर्दीत १६४ डावांमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार केला. याआधी सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड इंग्लंडच्या शार्ले एडवर्डच्या नावे होता. तिने १९१ डावांमध्ये ५९९२ धावा पूर्ण केल्या होत्या.

virat-kohali-02

२०१७ हे वर्ष ‘विराट’ वर्ष होतं असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कानपूरमधील न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये लागोपाठ शतक ठोकण्याच्या विक्रमात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगलाही मागे टाकले. याच शतकी खेळीसोबत तो सर्वात जलद नऊ हजार धावा करणारा खेळाडू बनला.

kuldeep-yadav-01

कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर कुलदीप यादव एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने मॅथ्यू वेड, एश्टन एगर आणि पेंट कमिन्स यांना बाद करत हॅटट्रिक पूर्ण केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना ५० धावांनी जिंकला.

rohit-sharma-01

मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे दुहेरी शतक पूर्ण केले. दुहेरी शतकांची हॅटट्रिक करणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. रोहितने १५३ चेंडूमध्ये १२ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने २०८ धावा केल्या.

rohit-sharma-02

रोहित शर्माने याच वर्षी टी-२० मधील सर्वात जलद शतक करण्याचा रेकॉर्ड केला. श्रीलंकेविरूद्ध त्याने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या विक्रमाची बरोबरी केली. रोहितने पहिल्या ५० धावा २३ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या. त्यानंतरच्या ५० धावा त्याने फक्त १२ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या.