‘राहुल गांधी चिकन खाऊन मंदिरात गेले’, येडीयुरप्पा यांचं वादग्रस्त ट्वीट

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. मंगळवारी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी.एस. येडीयुरप्पा यांनी एक वादग्रस्त ट्वीट केल्यानं खळबळ उडाली आहे. येडीयुरप्पा यांनी राहुल गांधी चिकन खाऊन हिंदूंच्या मंदिरात गेले असा आरोप केला आहे.

येडीयुरप्पा यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, ‘मासे खाऊन मंजूनाथ स्वामी यांचे दर्शन करणाऱ्या १० टक्के लोकांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैय्या हे आहेत आणि चिकन खाऊन नरसिंमा स्वामींच्या दर्शनासाठी आलेले राहुल गांधी फक्त निवडणुकांपुरते हिंदू आहेत. प्रत्येक वेळीस काँग्रेस हिंदूच्या भावनांना ठेच लागेल असे काम करत आली आहे.’ कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा यांनी स्थानिक भाषेतील ‘शूधि मूला’ या वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचा हवाला देत हे ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वींटनंतर कर्नाटकमध्ये वादळ निर्माण झालं असून विरोधकांनी त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, आपल्या चार दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी ११ फेब्रुवारीला कोप्पल जिल्ह्यातील कनकागिरी येथील कनकचला नरसिंमा स्वामींचे मंदिरात जावून दर्शन घेतले होते. राहुल गांधी दुपारी जेवण करून मंदिरात गेले होते आणि त्यांनी दुपारच्या जेवणात चिकन खाल्ल्याचा आरोप येडीयुरप्पा यांनी केला आहे. मात्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रिजवान अरशद यांनी येडीयुरप्पा यांचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी दुपारी मंदिरात जाणार असल्याने फक्त शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.