माहीत नसलेलं येडशी

अनंत सोनवणे

सह्याद्रीच्या बालाघाट पर्वतरांगांमध्ये येडशी रामलिंग अभयारण्य वसलं आहे. भगवान शंकराच्या रामलिंग मंदिरामुळे हा परिसर भाविकांच्या आकर्षणाचा विषय आहे…

महाराष्ट्रात अनेक अशी अभयारण्यं आहेत जी निसर्गप्रेमींना फारशी माहीत झालेली नाहीत. त्यामुळे तिथे सहसा कुणी जात नाहीत. धाराशीव जिल्हय़ातलं येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्य हे त्यापैकीच एक. लोकांना फारसं माहीत नसलेलं, तसंच आकाराने अगदीच छोटंसं. या अभयारण्याचं एकूण क्षेत्रफळ आहे अवघं २२.३८ चौ. कि.मी.

सह्याद्रीच्या बालाघाट पर्वतरांगांमध्ये येडशी रामलिंग अभयारण्य वसलं आहे. आसपासच्या कळंब, भनसगाव आणि वडगाव परिसरात ते पसरलं आहे. भगवान शंकराच्या रामलिंग मंदिरामुळे हा परिसर भाविकांच्या आकर्षणाचा विषय आहेच, शिवाय समुद्रसपाटीपासून उंचावर असल्यानं याला स्थानिक नागरिक हिल स्टेशनही मानतात.

येडशीचं जंगल शुष्क प्रकारात मोडतं. इथं  पाण्याचं प्रमाण कमी आहे. बराचसा भूभाग मोकळी माळरानं आणि गवताळ रानांनी व्यापलेला आहे. पाण्याच्या अभावामुळे ही रानं वर्षाचा बहुतेक काळ करडय़ा रंगाची दिसतात. घनदाट अरण्यांमधलं वन्यजीवन पाहण्याची सवय असलेल्यांना येडशीचं जंगल कदाचित अनाकर्षक वाटू शकतं. मात्र हे माळरानी जंगल एक वेगळय़ा प्रकारचा अधिवास आहे आणि त्या अधिवासात आढळणाऱया पशू-पक्ष्यांचा आसरा आहे. गवताळ रानांबरोबरच इथं बाभूळ, खैर, ऐन, धावडा, साग, मोह, भेरा, गराडी, कडुनिंब, हिवर, बोर, आपटा, सीताफळ, अर्जुन, बेल, सावर इत्यादी वृक्ष व वनस्पती आढळतात.

या अभयारण्याचं प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे इथलं पक्षीजीवन. इथे ११० पेक्षा जास्त पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. इथे प्रामुख्याने सापमार गरूड, खरूची, रानलावा, खडकलावा, राखी तित्तर, भटतित्तर, चंडोल, सुगरण, डोंबारी, काळा कोतवाल, करडा कोतवाल, पीतमुखी टिटवी, नकल्या खाटीक, तुईया पोपट, पावश्या, चातक, ढोकरी, गायबगळा, मध्यम बगळा, पांढऱया पोटाची पाणकोंबडी, अडई, टकाचोर, भारद्वाज, मोर, सातभाई, रानभाई, वटवटय़ा इत्यादी प्रजाती पहायला मिळतात.

सुदैवाने हे अभयारण्य पर्यटकांसाठी वर्षभर खुलं असतं. त्यामुळे इथं पावसाळय़ातही जाता येतं. पावसाळय़ाचा हा काळ म्हणजेच पक्ष्यांच्या वीणीचा हंगाम. नर-मादीची घरटं बांधण्याची लगबग, त्यांचं मीलन, अंडय़ातून इवल्याश्या पिल्लांचं बाहेर येणं, आई-बाबांचं पिल्लांना भरवणं, त्यांच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणं… हा सारा नाटय़मय घटनाक्रम जवळून पाहता येतो. पावसाळय़ाबरोबरच इथला हिवाळाही चांगलाच गजबजलेला असतो. कारण हिवाळय़ात इथं पाहुण्यांचं म्हणजेच स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन होतं.

इथलं वन्यजीवनही इथल्या अधिवासाला अनुसरून आहे. इथल्या गवतातून अचानक रानससा कधी दर्शन देतो, तर कधी एखादा मुंगूस किंवा साळिंदर दिसतो. कधी चिंकारा, खोकड किंवा रानडुक्कर मजेत चरताना दिसतो, नशीब जोरावर असेल तर तरसही दिसू शकतो. येडशीच्या या अभयारण्यात आपण स्वतःचं वाहन घेऊन जाऊन वन्यजीव व पक्षीनिरीक्षण करू शकतो. अन्य अभयारण्यांप्रमाणे इथे पर्यटकांची गर्दी नसल्याने गंभीर निसर्गप्रेमी इथल्या निसर्ग सौंदयाचा आणि वन्यजीवनाचा निवांतपणे व भरपूर आस्वाद घेऊ शकतो.

येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…विविध प्रजातींचे पक्षी

जिल्हा…धाराशीव

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…२२.३८ चौ.कि.मी.

जवळचे रेल्वे स्थानक…येडशी (४ कि.मी.)

जवळचा विमानतळ…संभाजीनगर (२२० कि.मी.)

निवास व्यवस्था…येडशी गावात लॉजेस

सर्वाधिक योग्य हंगाम…पावसाळा, नोव्हेंबर ते मार्च

सुट्टीचा काळ…नाही

साप्ताहिक सुट्टीचा दिवस…नाही