इस्रायलप्रश्नी हिंदुस्थान सरकारच्या भूमिकेविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होणार, योगी आदित्यनाथ यांचे आदेश

हमासने इस्रायलवर केलेल्या महाभयंकर हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारले आहे. या युद्धानंतर काहींनी इस्रायलची बाजू घेऊन आपली भूमिका मांडली तर काहींनी हमासच्या बाजूने भूमिका मांडली. हिंदुस्थानातही हेच चित्र पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशातील अलीगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी हमास आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चे काढले होते. या मोर्चांनंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने इस्रायल-हमास संघर्षावर हिंदुस्थान सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या विपरीत बोलणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नवरात्र आणि येणाऱ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलावली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की इस्रायल-हमास संघर्षावर हिंदुस्थान सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या विपरीत बोलणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. या बैठकीत बोलताना योगी आदित्यनाथ यांनी इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाचा उल्लेख करताना सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले. पोलीस प्रमुखांनी त्यांच्या भागातील धर्मगुरूंशी बोलावे आणि त्यांच्या माध्यमातूनही शांतता कायम राहील यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या बूमिकेशी विपरीत भूमिका कोणी घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्टपणे या बैठकीत सांगण्यात आले. सोशल मीडिया असो अथवा एखादे धार्मिक स्थळ, कोणी विखारी विधाने करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

इस्रायल आणि हमासमध्ये युद्धाला सुरुवात झाल्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडलेले पाहायला मिळतायत. काही इस्रायलवर टीका करतायत तर काही हमासवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर 9 ऑक्टोबर रोजी अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी पॅलेस्टाईनला समर्थन देण्यासाठी एका मोर्चात उतरले होते. यावेळी या विद्याप्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली होती. अलीगडप्रमाणेच चेन्नई आणि कोलकातामध्येही इस्रायलविरोधात आंदोलने करण्यात आली होती. 13 ऑक्टोबर रोजी एसआयओ इंडिया नावाची संघटना इस्रायलच्या विरोधात संपूर्ण देशात आंदोलन करणार आहे.