म्हणून दुसऱ्याने जांभई दिल्यावर आपल्यालाही येते..

सामना ऑनलाईन । मुंबई

जांभई, शिंक, उचकी, ढेकर, ठसका या आपल्या शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रिया आहेत. प्रत्येक माणसाच्या शरीररचनेनुसार त्यांचा उगम वेगवेगळा असतो. पण, या सगळ्यांमध्ये जांभई ही एकमेव अशी क्रिया आहे जी एकाने केली की लगेच त्याच्यासोबत असलेला दुसराही करतो. पण, असं का? यावर इंग्लंडमधल्या नॉटिंगहॅम विद्यापिठाच्या संशोधकांनी संशोधन सुरू केलं. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीने जांभई दिली की आपण कितीही प्रयत्न केला तर जांभई देणं रोखू शकत नाही. मेंदूत घडणाऱ्या विशिष्ट क्रियांमुळे आपणही जांभई देतो.

आपल्या मित्र-मैत्रिणीने, ऑफिसमधल्या सहकाऱ्याने किंवा ट्रेन, बसमध्ये समोरच्या माणसाने जांभई दिली की आपल्यालाही जांभई येते, असा अनेकांचा अनुभव आहे. शास्त्रज्ञांच्या मते एकाला जांभई देताना पाहून दुसऱ्याला जांभई येतेच. हे एखाद्या संसर्गासारखं आहे. यासाठी आपल्या मेंदूत होणाऱ्या काही विशिष्ट क्रिया जबाबदार आहेत. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी जांभई येणं रोखू शकत नाही. एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्यालाही जांभई द्यावीशी वाटते. ऑफिसमध्ये असलो की आपण यावर नियंत्रण मिळवण्याचं काम करतो. जांभई देण्याची पद्धत बदलू शकते, पण जांभई येणं थांबू शकत नाही, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

हे नेमक का आणि कसं घडतं याचं उत्तर मिळवण्यासाठी ३६ लोकांचं सर्वेक्षण केलं गेलं. या ३६ जणांनी आपल्या समोरच्यांना जांभई देताना पाहिलं. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, एखाद्याने जांभई दिली, की लगेचंच दुसऱ्याने जांभई देणं ‘इकोफेनोमिनन’ म्हणतात. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने केलेली क्रिया किंवा उच्चारलेले शब्द हे आपसुकच आपण पुन्हा करतो. त्यामुळे संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे या संशोधनातून ज्या आजारांमध्ये ‘इकोफेनोमिनन’ दिसून येतो अशा आजारांबाबत माहिती मिळवण्यास मदत होऊ शकते.