लवकरच फेसबुकमुळे कळेल तुमचे आर्थिक स्टेट्स

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फेसबुक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटांतील लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर करण्यात येतो. तसेच अनेकदा एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठीही फेसबुकचा वापर केला जातो. अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सदैव तप्तर असणारे फेसबुक लवकरच युजर्सचे आर्थिक स्टेट्सही सांगणार आहे. यामुळे फेसबुक वापरकर्त्यांची आर्थिक व सामाजिक कुवत काय हे सर्वांसमोर येणार आहे.

डेलीमेल या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी फेसबुकने या नवीन अपडेटसाठी एक पेटेंट खरेदी केले आहे. त्याद्वारे कोणत्याही युजर्सचे सामाजिक किंवा आर्थिक स्टेट्सची माहिती फेसबुकला कळणार आहे. त्याशिवाय या नवीन अपडेटमुळे फेसबुक युजर्स कामगार वर्ग, सामान्य वर्ग, उच्च वर्ग अशा तीन वर्गात विभागले जाणार आहेत. फेसबुकवर जाहिरात देणाऱ्या कंपन्याना आर्थिक स्टेट्स या पर्यायाचा जास्त उपयोग होणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

कसे करेल वर्गीकरण?
२०-३० वयोगटातील फेसबुक युजर्सला तुम्ही किती इंटरनेट डिवाइसचा वापर करता? तसेच ३०-४० वयोगटातील युजर्सला तुमचे स्वत:चे घर आहे का? यांसारखे काही प्रश्न फेसबुकद्वारे विचारले जाणार आहेत. या प्रश्नाला तुम्ही दिलेल्या उत्तरावरून तुमचे आर्थिक स्टेट्स समजणार आहे. याशिवाय निव्वळ टाईमपास म्हणून अपलोड केलेले एखाद्या ठिकाणचे फोटोही फेसबुकला यात मदत करणार आहे. तुम्ही महिन्याला किती कमावता असे प्रश्नांची विचारणा फेसबुकद्वारे करण्यात येणार नाही असेही फेसबुकने सांगितले आहे.