तरुणाई विसर्जानासाठी सज्ज

संजीवनी धुरी-जाधव

गणेश विसर्जनानंतर काठावर मूर्तींचे अवशेष, निर्माल्य, प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या पाहायला मिळतात. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर सुंदर समुद्रकिनारा कचरामय झालेला दिसतो. हा किनारा साफ करण्यासाठी आज मुंबईतील विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एकत्र जमून कचऱयाची विल्हेवाट लावली आणि स्वच्छतेचा अनोखा संदेश आपल्या कृतीतून दिला. निमित्त होते रजनी फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि युनायटेड फॉर ग्रेटर केस (यूएफजीसी) यांनी आयोजित केलेल्या ‘क्लिन एथॉन’ उपक्रमाचे. गणपती विसर्जनानंतर किनारे कचऱयाने अस्वच्छ दिसायला लागले. किनाऱयावर मोठय़ा प्रमाणात निर्माल्य पाहायला मिळते. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. आरोग्याच्या दृष्टीने ते घातकच… याच उद्देशाने रजनी फाऊंडेशन आणि युनायटेड फॉर ग्रेटर केस या संस्थांनी संयुक्तपणे हा उपक्रम हाती घेतला. उपक्रमासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे याच तयारीनीशी अनंत चतुर्थीसाठीही तरुणाई सज्ज झाली आहे.

उत्सव साजरे करताना पर्यावणाला हानी नको

स्वच्छतेच्या दृष्टीने समाजाला संदेश देण्याचा आमचा उद्देश आहे. सोशल साईट्वर तरुणाईने फक्त पोस्ट शेअर करण्यापेक्षा प्रत्यक्षात स्वच्छतेच्या दृष्टीने पावले उचलण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी मुंबईतल्या विविध शाळा-महाविद्यालयांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यावरून सहाशेच्या वर विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. आज समुद्रकिनाऱयावर पीओपीच्या गणपतीचे अवशेष मोठय़ा प्रमाणात मिळाले. सण साजरे करायलाच हवेत, पण त्याने पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे हे खरेच-रूपेश घोसाळकर, रजनी फाऊंडेशन

विसर्जनानंतरही जबाबदारी उरतेच

आमच्या उपक्रमाचे तिसरे वर्ष. आज सहाशेच्या वर विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. लोकांना वाटतं गणपती आणला, विसर्जन झाले की आपली जबाबदारी संपते. तसे नाही आहे हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी स्वच्छताही तितकीच आवश्यक आहे. उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत होता. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आजच्या तरुणाईला स्वच्छतेबद्दल आपसूक वाटायला लागलंय यातच खूप आहे. या उपक्रमासाठी तरुणांनी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला-शिवम पेडणेकर, यूएफजीसी

नवीन गोष्टी शिकले

खरं तर मी कधी अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी झाले नव्हते. मस्त आणि पहिलाच अनुभव होता. सकाळी बीचवर आलो, तेव्हा तिथे पाहावंसंही वाटत नव्हतं..पण जेव्हा तो स्वच्छ केला तेव्हा तिथून निघावंसं वाटत नव्हतं-वंदना अर्दाद,  उषा मित्तल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी

समाधान वाटले

अनुभव खूप छान होता. मी भवन्स कॉलेजची विद्यार्थिनी आहे. शिवाय या ग्रुपचीही सदस्य आहे. हा उपक्रम करताना मजा आली. या उपक्रमातून आपल्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे याची जनजागृती केली. आपली नैसर्गिक संपत्ती आपणच जपली पाहिजे हेही समजले. नवीन ओळखीही झाल्या. अस्वच्छ झालेला बीच स्वच्छ पाहून समाधान वाटले-गीता कदम, भवन्स विद्यार्थिनी