सँडविच खाल्ल्याने तरुणीचा मृत्यू


सामना ऑनलाईन। लंडन

इंग्लंडमधील एका तरुणीचा सँडविच खाल्याने मृत्यू झाला आहे. नताशा एडनान असे तिचे नाव आहे. ती विमानाने लंडनहून फ्रान्सला फिरण्यासाठी जात होती. पण त्याआधी तिने विमानतळावरील Pret a Manger या दुकानातून एक सँडविच विकत घेतले होते. सँडविचमधील पदार्थाची एलर्जी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

नताशा नाईस येथे सुट्टी घालवण्यासाठी जात होती. प्रवासादरम्यान खाण्यासाठी तिने ते सँडविच घेतले होते. विमानात बसल्यावर तिने ते सँडविच खाल्ले. पण ते खाल्ल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. तिच्या अंगावर लाल रंगाचे चट्टे उमटले. यामुळे केबिन क्रू ने तिच्यावर प्राथमिक उपचार केले. पण त्याचदरम्यान तिला हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर नाईस येथे विमान उतरताच तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सँडविचची एलर्जी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. नताशाच्या अकस्मिक मृत्यूने तिच्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. तर नताशाच्या मृत्यूवर Pret a Manger कंपनीने शोक व्यक्त केला आहे. तसेच आपण ग्राहकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतो. असे सांगत आपली बाजू स्पष्ट केली आहे.