लग्नास तरुणाने दिला नकार, ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीची आत्महत्या

suicide

विनोद पवार । पिंपरी

‘लिव्ह इन रिलेशन’शिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने लग्नास नकार दिल्याचा राग आल्याने 23 वर्षीय तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 14 नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास सांगवी परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी गेल्या तीन वर्षांपासून आयटीतील तरुणासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत आहे. तरुणाचे नुकतेच लग्न ठरले असल्याने तरुणी सैरभैर झाली होती. ‘माझ्याशी लग्न कर’ असा तगादा तिने त्या तरुणाकडे लावला होता. मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारली.

तरुणीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

काही दिवसांपूर्वी सांगवी परिसरातच लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या एकाने चाकू हल्ला करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असताना ही दुसरी घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.