‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे’ टी-शर्टवर छापल्याने तरुणाला अटक

सामना ऑनलाईन, बेळगाव

येत्या १७ फेब्रुवारी रोजी बेळगाव येथे होत असलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चाची जय्यत तयारी सीमाभागात सर्वत्र सुरू असताना ‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे’ या आशयाचा टी-शर्ट कर्नाटक शासनाच्या डोळ्यांत खुपला आहे. अशा टी-शर्टची विक्री करणारा कोल्हापूरचा तरुण शहाजी भोसले (२५) याला कानडी पोलिसांनी अटक केल्याने सीमाभागातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

shahaji-bhosle

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात सर्वत्र क्रांती मोर्चे काढण्यात आले. कर्नाटकाच्या ताब्यात असलेल्या बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकीसह ८६५ मराठी भाषिक गावांत लाखो मराठी बांधव असल्याने येथेही मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढण्यात येऊ लागले आहेत. यामध्ये सीमालढा चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगाव येथेही येत्या १७ फेब्रुवारी रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासह सीमाप्रश्न मागणीचा यामध्ये समावेश केल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीसह सीमाभागातील सर्व मराठी जनता या मोर्चासाठी एकवटली आहे. कर्नाटक सरकारलाही या मोर्चासाठी परवानगी द्यावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागात सर्वत्र या मोर्चाविषयी जनजागृती करून वातावरणनिर्मिती करण्यात येत असतानाच कर्नाटक सरकारचे या मोर्चाच्या तयारीवर बारीक लक्ष असल्याचे आज दिसून आले. महाराष्ट्रातील कोल्हापूरसह अन्य जिह्यांतील विक्रेते बेळगावमध्ये मोर्चासाठी लागणारे झेंडे, टी-शर्ट आदी साहित्याची विक्री करीत असून यातीलच ‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे’ अशा आशयाचा टी-शर्ट कर्नाटक शासनाच्या डोळ्यांत खुपला आहे.

आकसातून कारवाई

बेळगावमधील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे अशा टी-शर्टची विक्री करणाऱया कोल्हापूरच्या शहाजी भोसले या तरुणाला आज सकाळी खडेबाजार पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्याजवळ विक्रीसाठी आणलेले तीसहून अधिक टी-शर्ट आणि इतर साहित्यही जप्त केले. या टी-शर्टवरील मजकूर वादग्रस्त असल्याने ही कारवाई केल्याचे कानडी पोलिसांकडून कारण पुढे करण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती तर कानडी पोलिसांकडून मराठीद्वेष आणि आकसातून ही कारवाई करण्यात आल्याचा हा प्रकार काही नवा नाही. त्यामुळे अशा कारवाईला भीक घालत नसल्याची कडक प्रतिक्रिया सीमाभागातून उमटत आहे.