बोगस डॉक्टरचे इंजेक्शन तरुणाच्या जीवावर बेतले

सामना प्रतिनिधी । मुंबई

देवनार येथे दवाखाना थाटून बसलेल्या बारावी पास बोगस डॉक्टरचा इलाज एका २५ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला. थंडीतापाची तक्रार घेऊन गेलेल्या प्रदीप जाधव याला त्या बोगस डॉक्टरने इंजेक्शन दिले. त्यामुळे इन्फेक्शन होऊन प्रदीपचा नाहक बळी गेला. देवनार पोलिसांनी शाहबाज आलम मोहम्मद हारुण सिद्दिकी (३६) याला अटक केली आहे.

देवनारच्या संजय गांधी नगरमध्ये प्रदीप जाधव राहत होता. ५ तारखेला थंडीताप भरल्याने तो जवळच असलेल्या झाकीर हुसेन नगरमध्ये आलम क्लिनिकमध्ये गेला. शाहबाज आलम मोहम्मद हारुण सिद्दिकी हा ते क्लिनिक चालवत होता. सिद्दिकीने त्याला इंजेक्शन मारून घरी पाठवले, पण दुसऱ्या दिवशी जास्त त्रास होऊ लागल्यामुळे प्रदीप पुन्हा सिद्दिकीकडे गेला. तेव्हादेखील सिद्दिकीने त्याला औषध देऊन घरी पाठवले. मात्र ७ तारखेला प्रदीपचा डावा पाय प्रचंड दुखू लागला म्हणून तो परत डॉक्टरकडे गेला, पण सिद्दिकीचा दवाखाना बंद होता. ८ तारखेला प्रदीप पुन्हा आलम क्लिनिकमध्ये गेला. मात्र ते बंद असल्याने व त्याला प्रचंड अस्वस्थ वाटू लागल्यामुळे कुटुंबीयांनी त्याला शताब्दी रुग्णालय व तेथून राजावाडी रुग्णालयामध्ये नेले. तिकडून मग शीव रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. मात्र प्रदीपची प्रकृती खूपच चिंताजनक बनल्याने त्याला केईएम रुग्णालयामध्ये नेण्यास सांगितले. केईएममध्ये नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. चुकीच्या इंजेक्शनमुळे इन्फेक्शन होऊन प्रदीपचा मृत्यू झाल्याचे कळताच सिद्दिकी या बोगस डॉक्टरला अटक केल्याचे पोलीस निरीक्षक नाना शिंदे यांनी सांगितले.

भावाच्या डिग्रीवर भामट्य़ाची डॉक्टरकी
सिद्दिकीचा भाऊ डॉक्टर असून तो आझमगढ येथील बीयूएमएस आहे. भावाच्या डिग्रीवर सिद्दिकी हा गेल्या तीन वर्षांपासून झाकीर हुसेन नगरमध्ये दवाखाना मांडून बसला होता. भावाकडूनच इंजेक्शन, औषध कसे द्यायचे ते शिकला होता. त्या जोरावर तो बोगस डॉक्टरी करीत होता. अखेर प्रदीप जाधव हा तरुण सिद्दिकीच्या बोगसगिरीचा बळी ठरला.