भररस्त्यात तिने रोडरोमिओला तुडवला!

सामना ऑनलाईन । भरतपूर

रस्त्यावर येता-जाता होणारी महिला-मुलींची छेडछाड, पाठलाग ही आता एक सामान्य बाब झाली आहे. अनेक महिला अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात. पण, त्यामुळे अशा लंपट वृत्तीच्या पुरुषांचं चांगलंच फावतं. मात्र, राजस्थानातील भरतपूर येथील एका तरुणीचा पाठलाग करणाऱ्या एका तरुणाला चांगलाच मार पडला आहे.

हा तरुण भरतपूर येथे राहणाऱ्या एका तरुणीच्या मागे लागला होता. तो सतत तिचा पाठलाग करत असे. पण, तरुणी दाद देत नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने परिसरात आपले व त्या तरुणीचे प्रेमसंबंध असल्याच्या अफवा पसरवायला सुरुवात केली. ही गोष्ट जेव्हा या तरुणीला समजली तेव्हा तिची चांगलीच सटकली. तिने त्याला गाठलं आणि त्याची भररस्त्यात फ्रीस्टाईल धुलाई करायला सुरुवात केली. तरुणावर ‘हात साफ’ करून झाल्यानंतर तिने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

”कोणताही तरुण स्वतःला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा मुलगा समजत असेल तर, अशा कोणत्याही गैरसमजात त्याने जगू नये. कुठलीही तरुणी कमकुवत नसते. तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडल्यात की आम्ही आमचा आवाज उठवणारच आणि मग तुमची काय स्थिती होईल, याची तुम्हीच कल्पना करा”, असा संदेश त्या तरुणीने दिला आहे.