सावधान.. तुमची खासगी माहिती विकली जाऊ शकते

सामना ऑनलाईन । मुंबई

मथळा वाचून चक्रावला असाल ना.. पण, असं होऊ शकतं. तुमची खासगी माहिती विकली जाण्याची शक्यता आहे. तुमचा इमेल आयडी, फोन नंबर, वय, वैवाहिक स्थिती, व्यवसाय इत्यादींची माहिती अगदी चॉकलेटपेक्षा कमी किमतीला विकली जाऊ शकते.इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार बाजारात काही डेटा दलालांचं जाळं असून ते लोकांची वैयक्तिक माहिती हॅक करून विकू शकतात. त्यासाठी योजलेले हॅकर्स १० ते १५ रुपयांमध्ये बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्लीतल्या एक लाखाहून जास्त लोकांची वैयक्तिक माहिती हॅक करू शकतात, असं या अहवालात म्हटलं आहे.

या अहवालाच्या माहितीनुसार काही दलाल तर त्यांच्या आसपास वावरणाऱ्या अनेकांची माहिती हॅक करू शकतात. यात अगदी इतर क्षेत्रांसारखीच दलाली चालते. एखाद्या सामान्य माहितीच्या एक्सेल शीटसारखी लोकांची वैयक्तिक माहिती अशी मोठ्या संख्येने उपलब्ध होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या फोन नंबरपर्यंतची वैयक्तिक माहिती हॅकर्स मिळू शकतात.

काही मल्टी नॅशनल बँकांच्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड्स, डेबिट किंवा प्रीमिअम कार्ड्स यांची माहिती मिळवणं सोपं असून ती निव्वळ १ ते ७ हजार रुपये किमतीला विकली जाऊ शकते, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या डेटा दलालांमुळे इंटरनेटवर अनेक जण फसवले जाऊ शकतात. जे लोक ऑनलाईन बँकिंग किंवा डिजीटल पेमेंट करत असतील, अशांना याचा फटका बसू शकतो, असं या अहवालात म्हटलं आहे.