वीजवाहक तार अंगावर पडून एका युवकासह म्हशीचा मृत्यू


सामना प्रतिनिधी । पाथर्डी

वीजवाहक तार अंगावर पडून एका युवकासह म्हशीचा मृत्यू होण्याची घटना तालुक्यातील लांडकवाडी येथे आज सकाळी घडली. या घटनेत मयत झालेल्या तरुणाचे नाव सोन्याबापू अर्जुन कावळे (२२) असे आहे. या घटनेला वीजवितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी करत वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

सोन्याबापू कावळे हा तरुण आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या अंगणात म्हशीचे दूध काढण्यासाठी गेला असता घराच्या वर असलेली वीजवाहक तार अचानकपणे तुटली व ती कावळे व तेथेच बांधलेल्या म्हशीच्या अंगावर पडली. या वेळी वीजप्रवाह चालू असल्याने दोघांनाही विजेचा धक्का बसला व दोघेही जागीच ठार झाले. या घटनेने मात्र वीजवितरण कंपनीचा गहाळ कारभार उघडकीस आला आहे. ज्या वीजवाहक तारा तुटल्या त्या १९७४ साली बसवण्यात आलेल्या असून त्या आता जीर्ण झालेल्या असल्याने त्या बदलाव्यात अशी मागणी लांडकवाडी परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा वीजवितरण च्या कार्यालयाकडे केली मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या परिसरात असलेल्या वीजवाहक तारांना अनेक ठिकाणी जोड देण्यात आलेले असून या पूर्वी वीजवाहक तारा तुटून तीन जनावरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

या परिसरासाठी गेल्या सहा महिन्यापासून वायरमन नसल्याने आपली कैफियत कोणापुढे मांडायची असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.आज सकाळी कावळे यांचा मृत्यू झाल्या नंतर घटनास्थळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट, पंचायत समितीचे सदस्य सुनील ओव्हळ, ग्रामस्थ रभाजी गर्जे, प्रकाश गर्जे, राजू गर्जे, भाऊसाहेब गर्जे, संदीप गर्जे, बाप्पू कावळे, देविदास आंधळे, नवनाथ जिवडे, मच्छिन्द्र कावळे, नवनाथ गर्जे ,नितीन कावळे, रामहरी जिवडे, सुदाम जिवडे हे आले व त्यांनी या प्रकरणास वीजवितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी जबादार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली मात्र पो. निरी. रमेश रत्नपारखी यांनी पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल असे आश्वासन दिल्या नंतर कावळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.