एक किलो तांदुळ चोरले म्हणून आदिवासी युवकाची हत्या

1

सामना ऑनलाईन । कोच्ची

माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना केरळच्या पलक्कड जिल्ह्यात घडली आहे. याठिकाणी एका आदिवासी व्यक्तीचा लोकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मधू कडुकुमन्ना (२७) असं व्यक्तीचं नाव आहे. मधूची चुकी एवढीच होती की त्याने एक किलो तांदुळ चोरले होते. एवढ्या क्षुल्लक कारणावरून लोकांनी मधूला बेदम मारहाण तर केलीच मात्र या मारहाणी दरम्यान त्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले आणि व्हिडीओ देखील काढले. पीडित मधूसोबतचे हे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली असून आणखी काही जणांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधू आदिवासी भागात राहतो. लोकांनी मधूवर तांदुळ चोरल्याचा आरोप केला होता. चोरीच्या आरोपानंतर लोकांनी त्याला लाढ्या-काढ्यांनी मारहाण केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर जखमी मधूला पोलिसांनी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र रुग्णालयात नेत असतानाच मधूचा पोलिसांच्या गाडीतच मृत्यू झाला.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून या घटनेचा निषेध केला. त्यांनी लिहिलं की, ही घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.