आईने गांजासाठी दहा रुपये दिले नाही म्हणून तो टॉवरवर चढला

सामना ऑनलाईन । रांची

गांजा विकत घेण्यासाठी आईने दहा रुपये दिले नाहीत म्हणून एक तरुण रांचीतील दोनशे फूट उंच मोबाईल टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली होती. या तरुणाने शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न करत संपूर्ण गाव जमा केला होता. भुवा ठाकूर असे त्या तरुणाचे नाव आहे.

भुवा याला दारू व गांजाचे व्यसन होते. तो कामधंदा न करता कायम दारू ढोसत असायचा. गुरुवारी भुवाला गांजाची तल्लफ आली मात्र त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने आईकडे दहा रुपये मागितले. मात्र त्याच्या आईने पैसे न देता त्याला घरातून हाकलून दिले. त्यामुळे चिडलेला भुवा थेट मोबाईल टॉवरवर चढला. तिथून उडी मारणार असल्याची धमकी त्याने दिली. काही वेळात पोलिसही तेथे पोहोचले. पोलीस, गावकरी, भुवाची आई सर्वच त्याला खाली उतरण्याची विनंती करत होते. मात्र दोन तास झाले तरी भुवा खाली उतरला नाही म्हणून पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाची गाडी येताना त्याला दिसली. त्यानंतर तो टॉवरवरून उतरला व पोलिसांना चकमा देऊन पळून गेला.