लष्करात नोकरी मिळाली नाही म्हणून तरुणाची आत्महत्या

सामना ऑनलाईन । आग्रा

लष्करात भरती होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करूनही निवड होत नसल्याने एका तरुणाने कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आग्रा येथे घडली आहे. या तरुणाने फेसबुकवरून लाईव्ह स्ट्रिमिंग करून आत्महत्या केली असून जवळपास अडीच हजार लोकांनी त्याच्या आत्महत्येचा भयंकर व्हिडीओ लाईव्ह बघितला.

बीएसस्सी पदवीधर असलेला मुन्ना कुमार हा गेल्या पाच वर्षांपासून लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र प्रत्येकवेळी काही ना काही कारणाने त्याची निवड होत नव्हती. मुन्ना हा २४ वर्षाचा झाला होता. आता लष्कराच्या निवडीचे वय उलटून गेल्याने त्याला पुन्हा एकदा लष्कराकडून नकार कळविण्यात आला होता. त्यामुळे आता आपण कधीच लष्करात भरती होऊ शकत नाही याची जाणीव झाल्याने मुन्नाने आत्महत्येचा निर्णय घेतला. बुधवारी सकाळी त्याने फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत गळफास घेतला. त्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे.

‘माझा भाऊ हा शहीद भगत सिंग यांना आदर्श मानायचा. त्यामुळे त्याने लष्करात भरती व्हायचा निर्णय घेतला होता. मात्र सतत येणाऱ्या नकारांमुळे तो खचला होता. त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आहे असे आम्हाला बिलकूल जाणवले नाही. तो नेहमीप्रमाणे शांतपणे आमच्यासोबत जेवला व त्याच्या खोलीत जाऊन झोपला, असे मुन्ना कुमारचा भाऊ विकास कुमारने पोलिसांना सांगितले.