प्रेयसीने दिला धोका, प्रियकराची रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या

प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । कल्याण

राजेश भंडारी या तरुणाने सोमवारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात रेल्वे गाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी राजेशने सुसाईड व्हिडीओ बनवून मित्रांना आणि भावाला पाठवला होता. त्याला एका तरुणीने प्रेमाचं नाटक करून त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे व्हिडीओत म्हटले आहे. सुसाईड व्हिडीओवरून राजेशच्या आत्महत्येचा तपास सुरु झाला आहे.

राजेश हा कल्याण जवळील मोहने परिसरात राहत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर त्याचे प्रेम होते. त्याने तिच्यासोबत लग्न करायचे देखील ठरवले होते. मात्र नेमकं काय असं झाले की राजेशने तिच्या त्रासाला कंटाळून आपले जिवनच संपवले.

दरम्यान “ती” तरुणी राजेश कडून पैसे घ्यायची आणि पैशांसाठी ती नेहमी राजेशला त्रास द्यायची असा आरोप राजेशच्या आईने केला असून तिच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी सुसाईड व्हिडीओच्या आधारे पुढील तपास सुरु केला आहे. तपासाअंती राजेशच्या आत्महत्येचे खरे कारण समोर येणार आहे.