विजेचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू, महावितरणच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

अंबरनाथमध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. रिझवान शेख असं या तरूणाचे नाव आहे. रिझवानच्या गॅरेजच्या वीजपुरवठा खंडीत झाल्याने महावितरणकडे तक्रार दिली होती, मात्र महावितरणकडून रिझवानलाच वायर आणायला सांगितली आणि वीज पुरवठा सुरु असताना त्याला झाडाची फांदी तोडायला सांगितल्याने विजेच्या जोरदार धक्याने रिझवानचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी महावितरणच्या 4 कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथच्या लादिनाका परिसरात रिझवान शेख याच्या गॅरेजमधील विद्युत पुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडित झाला होता, त्यामुळे वीजपुरवठा दुरुस्त करण्यासाठी रिझवानच्या भावाने महावितरणकडे तक्रार केली होती. मात्र वायर नसल्याचे कारण देत, तुम्हीच वायर विकत आणून द्या आम्ही वीज पुरवठा सुरळीत करून देतो असे उत्तर त्यांना देण्यात आले. त्यामुळे रिझवानने वायर आणली. मात्र दुरुस्तीसाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रिझवानला विद्युत वाहिनीतील वीज प्रवाह बंद असल्याचे सांगून तेथील झाडाची फांदी तोडायला सांगितले. रिझवान फांदी तोडत असताना त्याला तारेचा जोरदार झटका लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करीत असताना वीज पुरवठा खंडित करणे अपेक्षित होते, मात्र विद्युत प्रवाह सुरु ठेवल्याने रिझवानचा हकनाक बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात महावितरच्या चार कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.