ख्राइस्टचर्च मशिदींवरील हल्ल्यात गुजरातचा जुनैद ठार

सामना ऑनलाईन । ख्राइस्टचर्च

न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च मशीद हल्ल्यात गुजरातच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जुनैद कारा असे त्याचे नाव असून तो नवसारीचा रहिवासी होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो कुटुंबीयांसह न्यूझीलंडमध्ये राहत होता. तो तेथे एक दुकान चालवत होता. शुक्रवारी मशिदीत नमाज पढण्यासाठी तो गेला असता हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, हल्लेखोराला अटक केल्यानंतर शनिवारी आरोपी ब्रेंटन हॅरिसनला टारंट न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी 5 एप्रिलपर्यंत त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र यावर ब्रेंटनने जामिनासाठी अपील केले नाही. ब्रेंटन मूळचा ऑस्ट्रेलियाचा असून तो माजी शारीरिक शिक्षक आहे. त्याच्यावर ख्राइस्टचर्च मधील दोन मशिदींवर बेछूट गोळीबार करून 49 नागरिकांना ठार व 20 हून अधिक लोकांना जखमी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैंसिंडा अर्डन यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असून यात फक्त पर्यटक व शरणार्थी नागरिक ठार झाले आहेत. यामुळे हा हल्ला दहशतवादी हल्लाच आहे, असे म्हटले आहे. ख्राइस्टचर्च मशिदींवरील हल्ल्यानंतर 9 हिंदुस्थानी नागरिक बेपत्ता आहेत.