न्यू ईयर पार्टीत तरूणीला जबरदस्ती किस करणाऱ्या तरूणाला अटक

सामना ऑनलाईन । मुंबई

कुलाबा येथील एका पबमध्ये नवीन वर्षाच्या पार्टीत तरूणीला जबरदस्ती किस करणाऱ्या तरूणाला अटक केली आहे. हा तरूण दारूच्या नशेत होता. या पबच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका हवालदाराच्या मदतीने पीडित तरूणीने पोलिसांत तक्रार नोंदविली होती.

बेलापूर येथे राहणारा हा तरूण मित्रांसोबत सोमवारी कुलाब्यातील कुलाबा वॉटरींग होल या पबमध्ये आला होता. तेथे सदर तरूणी देखील तिच्या मित्र मैत्रिणीसोबत आली होती. आरोपी तरूण पार्टीमध्ये भरपूर दारू प्यायला होता. दारूच्या नशेत त्याने तरुणीकडे तिचा नंबर व पत्ता विचारला. त्यानंतर काही वेळाने त्याने त्या तरूणीच्या ओठांवर जबरदस्ती किस केले. याप्रकरणी तरुणीने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्या तरूणाला अटक केली. या तरूणाची जामिनावर सुटका झाली आहे.

हवालदाराने केली मुलीची मदत
या पबच्या बाहेर सुरक्षेसाठी एक हवालदार तैनात होता. या हवालदाराने तरूणीसोबत घडलेला प्रकार बघितला व त्याबाबत वरिष्ठांना कळविले पण वरिष्ठांनी हा प्रकार गंभीर नसल्याचे सांगून त्यात लक्ष न देण्याचे आदेश दिले. पण पण पीडित तरूणीने त्या हवालदाराकडे मदत मागितली व त्या तरूणाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या हवालदाराने आरोपी तरूणाला अटक केली.