पाणीटंचाईचं विघ्न… जमत नाही लग्न, तरुणांना कुणी मुलगी देईना

259

सामना प्रतिनिधी । मुरबाड

लग्न ही घटना प्रत्येकाच्या आयुष्याला नवी उभारी देण्याचे काम करते. पण मुरबाडच्या खोपीवली गावात गेल्या दहा वर्षांपासून ‘आली लग्न घटी समीप नवरा…’ ही मंगलाष्टक ऐकूच आलेली नाही. सनई, चौघडा सोडाच पण या गावातील मुलाचे स्थळ आल्यास मुलीकडची मंडळी नको रे बाबा… असेच उद्गार काढतात. कारण काय, तर पाणीटंचाई! खोपीवलीमधील बोअरवेल, विहिरी कोरडय़ाठाक पडल्या असून बिनपाण्याच्या या गावात आपल्या मुलीची लग्न गाठ बांधण्यास कुणीच तयार होत नाही. त्यामुळे शिकल्या-सवरलेल्या उपवर मुलांचे लग्न जुळणार तरी कसे, या चिंतेने त्यांच्या आई-वडिलांची झोप उडाली आहे.

मुरबाडपासून 25 कि.मी. अंतरावर असलेले खोपीवली गाव हे भीमाशंकर अभयारण्याच्या हद्दीत येते. एकूण 1 हजार 900 लोकसंख्या असून सुमारे 600 घरे आहेत. या गावातील सुमारे 100 तरुण पदवीधर आहेत. त्यातील काहीजण तर बीकॉम, एमकॉम, बीएड एवढेच नव्हे तर सीएपर्यंत शिक्षण घेतले असून अनेक तरुण छोटा मोटा व्यवसायदेखील करतात. ही सर्व मुले लग्नाची झाली आहेत. अनेकांना स्थळे येऊ लागली पण खोपीवली गावात पाणीच नाही हे समजल्यावर काहींनी आपली मुलगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

– केवळ पाणीटंचाईमुळे खोपीवलीमधील मुलांची लग्ने होत नसल्याने गावातील प्रतिष्ठाrतांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. हुशार व शिकलेली मुले असूनही त्यांच्यावर ही वेळ आल्याने मुलांमध्ये नैराश्य निर्माण झाल्याचे विलास कराळे या तरुणाने सांगितले.

– खोपीवली गावात नोव्हेंबर महिन्यापासूनच दरवर्षी पाणीटंचाई सुरू होते ती जूनपर्यंत असते. गावात 40 बोअरवेल आणि 6 विहिरी असूनही त्या कोरडय़ा पडल्याने आता माता-भगिनींना पाणी आणण्यासाठी शेजारच्या मिल्हे गावात पायपीट करावी लागते. पाणी विकत आणल्य़ाशिवाय घरातली चूलच पेटत नाही.
आमच्या मुलांचे आयुष्य वाचवा!

खोपीवली गावातील रहिवाशांना वर्षातील सात महिने पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. दिवसातील चार ते पाच तासांचा वेळ केवळ पाण्यासाठी खर्च होत असेल तर बाकीची कामे करायची तरी कशी व केव्हा, असा सवाल उपसरपंच लक्ष्मण धुमाळ यांनी केला. सरकारने या गावातील भीषण पाणीटंचाईवर तोडगा काढून आमच्या मुलांचे आयुष्य वाचवावे, अशी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या