प्रॉपर्टीसाठी नातवाने दिली आजोबाची सुपारी


सामना प्रतिनिधी, मुंबई

आजोबांच्या नावावर मोठी प्रॉपर्टी आहे. जर आजोबांना ठार मारले तर त्यांची प्रॉपर्टी आपल्याला मिळेल या लालसेने आपल्याच आजोबांची सुपारी देऊन त्यांची गुंडाकरवी हत्या करणाऱ्या नातवाला माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. शिवाय हत्या करणाऱ्या चौघांनादेखील जेरबंद केले आहे.

शहिद भगत सिंग मार्गावरील संत निवास इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मंगळवारी सकाळी तेजलिंग लामा (87) यांचा रक्ताचा थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला होता. छाती व पोटात वार करून त्यांनी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे, पोलीस निरीक्षक रागिणी भागवत, उपनिरीक्षक सचिन पाटील, रविंद्र पाटील, योगेश भोसले, निलेश शेवाळे , रोहित रासम, स्वप्निलशिंदे, चेतन मसुटणे आदि कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला. पोलिसांनी लामा यांचा नातू दोर्जी तेनसिंग लामा (29) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तेजलिंग यांच्या हत्येचा उलगडा झाला. आजोंबांना ठार मारले तर त्यांची प्रॉपर्टी आपल्यालाच मिळेल या लालसेपोटी सुपारी देऊन आजोबांची हत्या केल्याची कबूली दोर्जीने दिली.

चार आरोपी सराईत गुन्हेगार
दोर्जीने आजोबांची हत्या करण्यासाठी चौघांना प्रत्येकी दीड लाखाची सुपारी दिली होती. त्यापैकी उत्कर्ष सोनी (19)आणि जयेश कनोजिया (19) या दोघांनी तेजलिंग यांच्या छाती आणि पोटात भोसकले तर अर्जेल भिसे (22) आणि आनंद राय (21) या दोघांनी त्यांना पकडून धरले होते. हे सर्व डोंबिवलीचे असून त्यांच्यावर खून, जबरी चोरी, घरफोडी, मारामारीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले.

summary- youth killed grandfather for property