आर्णीतील युवकाने बनवली पेट्रोलवर धावणारी सायकल

प्रसाद नायगावकर । यवतमाळ

गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. त्याचा प्रत्यय आर्णी या गावातील राहिल शेख या तरुणाकडे पाहून ग्रामस्थांना नक्कीच आली असेल. अपघातात बसलेल्या धडकेमुळे तुटलेली सायकल जोडत त्याने चक्क पेट्रोलवर चालणारी सायकल तयार केली आहे.

घरची परिस्थिती बेताचीच असलेल्या राहिलच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यावेळी १६ वर्षांचा राहिल नववीत शिकत होता. घरची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याने एका इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये नोकरी पत्करली. १७ जून रोजी दुपारी १ वाजता राहिल आपल्या सायकलवरून कामाला जात होता. वाटेत एका दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे त्याच्या सायकलचं पुढचं चाक दबलं. राहिल तशीच तुटकी सायकल घेऊन घरी गेला. सायकल दुरुस्त करण्याएवढे पैसे नसल्याने त्याने घरच्या जुन्या लुना गाडीचं चाक सायकलला लावलं. ते नेमकं बरोबर बसलं. ते पाहून राहिलच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्याने लुनाच्या दुसऱ्या टायरसकट तिचं इंजिनही सायकलला बसवलं.

इतर सर्व तांत्रिक बदल केल्यानंतर त्याला आपली सायकल पेट्रोलवरही चालत असल्याचा शोध लागला. राहिलने बनवेलली सायकल पन्नास किलोमीटर इतक्या एव्हरेजने धावते. ग्रामस्थांनीही राहिलचं कौतुक केलं असून त्याची सायकल पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी ते गर्दी करत आहेत.