लग्न होण्याआधीच त्याचा बळी गेला, होणाऱ्या पत्नीला त्रास देतो म्हणून हटकल्याने राग काढला

सामना ऑनलाईन, मुंबई

लग्न ठरलेल्या मुलीला एक तरुण त्रास देतो म्हणून हटकल्याने झालेल्या हाणामारीत नीतेश पाटील या तरुणाचा बळी गेला. होणाऱया पत्नीला त्रास देणाऱया तरुणाने गुंड जमवून नीतेश आणि त्याच्या मित्रांना जबर मारहाण केली. त्यांचा मार वाचविण्यासाठी पळताना अपघातात नीतेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी पाचजणांना अटक केली.

नीतेश याचे मोनिका या तरुणीशी लग्न ठरले होते. कांदिवलीच्या ऑस्कर हॉस्पिटल येथील रुग्णवाहिकेचा चालक प्रफुल्ल हिंगवले हा त्रास देत असल्याची तक्रार मोनिकाने नीतेशकडे केली. नीतेश हा किरण आणि कैलास या दोन मित्रांना घेऊन प्रफुल्ल याला जाब विचारण्यासाठी गेला. याचा राग मनात धरून प्रफुल्ल याने गुंड जमा केले. या गुंडांनी लाथा बुक्यांनी आणि पट्टय़ांनी तिघांना मारहाण केली. त्यांचा मार चुकविण्यासाठी मोटारसायकलवरून पळत असताना नीतेश आणि कैलास यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये नीतेशचा मृत्यू झाला. चारकोप पोलिसांनी याप्रकरणी प्रफुल्ल याच्यासह पाचजणांना अटक केली. न्यायालयाने या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.