बेरोजगार तरुणाने मुख्यमंत्र्यांवर भिरकावली बाटली

सामना ऑनलाईन । अहमदनगर

भरसभेत कित्येकदा राजकीय नेत्यांवर विविध गोष्टी भिरकावल्याचे प्रकार घडत असतात. राळेगणसिद्धी येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत एका दिव्यांग तरुणाने त्यांच्या दिशेने पाण्याची बाटली भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी तरूणाला ताब्यात घेतलं आहे. प्रशांत महादेव कानडे असं या तरुणाचं नाव आहे.

कृषी पंपांना बारा तास सलग वीज पुरवण्यासाठी राळेगणसिद्धीत दोन हजार मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याच सौरकृषी वीज वाहिनी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री राळेगणसिद्धीत उपस्थित होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी या प्रकल्पाचा नारळ फोडला. त्याचवेळी बाटली भिरकावण्याचा प्रकार घडला आहे.

प्रशांत कानडे नगर तालुक्यातील मेहकरीचा रहिवासी आहे. प्रशांत हा दिव्यांग असून तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. बँकेत शिपाई पदावर नोकरी मिळावी यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र नोकरी मिळत नसल्याने तो नाराज होता. बँकेत शिपायाची किंवा तत्सम नोकरी मिळावी यासाठी त्याने जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री सचिवालयाला पत्र दिलं होतं. परंतु, दहा महिन्यांनंतरही त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रशांतच्या रागाचा अखेर उद्रेक झाला.

  • mahendrapadalkar

    शिव उद्योग मधे रोजगार द्या. उगाच टवाळी बंद करा.