राज्यस्तरीय खोखो स्पर्धेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

अभ्यासाबरोबर खेळही तितकाच महत्वाचा आहे. खेळामुळे आरोग्य सुदृढ होते. खेळामुळे डॉक्टरकडे जावे लागणार नाही. त्यामुळे खेळ हा तितकाच महत्वाचा घटक असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खोखो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, एखाद्या क्रीडास्पर्धेचे उद्घाटन माझ्या हस्ते होणे हे मी माझे सौभाग्य समजतो. कारण खेळाला खूप महत्व आहे. मीही फुटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे. सर्व मैदानी स्पर्धांमध्ये पंच आणि आयोजकाची भूमिका महत्वाची असते. चांगले आयोजक असतील तर ती स्पर्धा चांगली होते. या स्पर्धांमध्ये पंचांची भूमिका महत्वाची असते, असे सांगताना आदित्य ठाकरे यांनी सचिनचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, सचिन तेंडूलकरला प्रत्येकवेळी पंचानी शून्यावर बाद दिले असते तर काय झाले असते? त्यामुळे खेळाडूंच्या भवितव्यात पंचांचा वाटा खूप महत्वाचा आहे. निवड समितीचे लोक खेळ पाहून निवड करत असतात. उद्या या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी चांगले खेळाडू निवडले जातील. त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. आता खो खो खेळासाठी चांगले खेळाडू तयार करणे आणि या खेळासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही पाठीशी उभे राहू, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.

यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परीषद अध्यक्षा स्नेहा सावंत, बांधकाम सभापती अरुण कदम, युवासेनेचे राज्यकार्यकारीणी सदस्य योगेश कदम, सिध्देश कदम, बाळा कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, शहरप्रमुख राजू देवळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.