वायएसआर काँग्रेस नेत्याची हत्या, सीबीआय चौकशीची मागणी

सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम

वायएसआर काँग्रेसचे नेते वायएस विवेकानंद रेड्डी (68) यांच्या हत्त्येमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी त्यांच्या कडप्पा येथील राहत्या घरी वायएस विवेकानंद यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. त्यांच्या शरीरावर 7 ठिकाणी धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळल्या आहेत. वायएस विवेकानंद हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ होते. ते खासदार, आमदार आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

वायएस विवेकानंद रेड्डी यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाच्या पथकाकडून तपासणी केली. फॉरेन्सिक विभागाच्या अहवालात रेड्डी यांची हत्या गुरुवारी रात्री 11.30 ते शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास करण्यात आल्याचे नमूद केले आहे. हत्येमागचे नेमके कारण अजून समजले नाही नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर वायएसआर काँग्रेसने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मात्र या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी केल्यास केंद्र सरकार दोषींना वाचवेल असा गंभीर आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.