विद्यापीठाचा गोंधळी कारभार सुधारा, युवासेनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

3

सामना ऑनलाईन । मुंबई

टीवाय निकालांना जबाबदार असणाऱ्या कुलगुरूंची हकालपट्टी करण्यात आली असली तरी निकालाचे काम करणाऱ्या मेरिट ट्रॅक कंपनीवर अजूनही गुन्हा नोंद करण्यात आला नाही. पदवीधर अधिसभा सदस्यांची निवडणूक अजून रखडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न कोण सोडवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा गोंधळी कारभार सुधारा अशी मागणी युवासेनेने आज शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराबाबत युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी शिक्षमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी युवासेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे, माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत उपस्थित होते. विद्यापीठात महत्त्वाची जबाबदारी असलेली कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा संचालक ही पदे अजूनही प्रभारी आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या निर्णयांबाबत हे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार असा सवाल निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या ‘मेरिट ट्रॅक’कंपनीवर अद्याप फौजदारी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल युवासेनेने केला आहे. विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विद्यापीठाने काय उपाययोजना केली आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. विद्यापीठाचा हा कारभार पाहता आपण विद्यापीठ चालवतोय की प्रोप्रायटरची कंपनी असा प्रश्न निर्माण होत असल्याचे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी निवेदनात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणीही आली आहे.

विद्यार्थी परिषदेची निवडणूक जाणीवपूर्वक लांबवली
नवीन विद्यापीठ कायदा मंजूर होऊनही जुन्या तरतुदीनुसार विद्यापीठ परिषद निवडणूक घेऊन विद्यापीठ काय साधत आहे असा प्रश्न युवासेनेने केला आहे. विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांना फक्त एका महिन्याचा कालावधी दिल्याने विद्यापीठ जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा आरोपही युवासेनेने केला आहे. जुलै २०१७ मध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदारांची नोंदणी जाहीर होऊनही इतक्या उशिरा मतदार यादी का जाहीर करण्यात आली, असा सवालही युवासेनेने केला आहे.