जोशी-बेडेकर महाविद्यालयात युवा सेनेचा आवाज

सामना ऑनलाईन । ठाणे

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या युवासेनेचा आवाज आता जोशी-बेडेकर महाविद्यालयात घुमणार आहे. त्यासाठी युवासेना कॉलेज कक्षाचे प्रमुख वरुण सरदेसाई व खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत खास युनिटची स्थापना करण्यात आली असून स्वच्छता, अटेंडन्स, फी आदी बाबींकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. विद्यार्थी, व्यवस्थापन व प्राध्यापक यांच्यात समन्वय साधण्यात येणार असून युवासेनेच्या कॉलेज युनिट कक्षामुळे शेकडो विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

आगामी वर्षापासून सुरू होणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुकांचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. त्यातच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-ठाण्यातील विविध महाविद्यालयांत युवासेनेच्या कॉलेज कक्ष युनिटच्या कार्यक्रमांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जोशी-बेडेकर महाविद्यालयात कॉलेज कक्ष युनिटचे युवासेना कॉलेज कक्षाचे प्रमुख वरुण सरदेसाई यांच्या हस्ते व खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

युवासेनेच्या स्थापनेपासूनच ठाण्यात उत्तमोत्तम युवा कार्यकर्ते विद्यार्थी चळवळीला लाभले. त्यामुळे जोशी-बेडेकर महाविद्यालयातील कॉलेज कक्ष युनिटच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांचे प्रश्न युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ सोडवावेत, असे आवाहन सरदेसाई यांनी यावेळी केले. ठाण्यावर नेहमीच भगवा फडकला असून येथील प्रत्येक महाविद्यालयात कॉलेज कक्ष युनिट स्थापन करू, असे खासदार राजन विचारे यांनी यावेळी सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्याशी चर्चा करण्यात आली. शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेवक सुधीर कोकाटे, शाखाप्रमुख सचिन चव्हाण, पवन कदम, राहुल लोंढे, युवासेनेचे नितीन लांडगे, सुमित भोईर, भावेश चौधरी, डिंपल भोरपकर, करण महाडिक, निखिल ठोंबरे, ओमकार शिंदे उपस्थित होते.