टक्के आणि टोणपे

2

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रस्थापितांना दणका बसला, भाजपची संख्यात्मक वाढ झाली हे खरेच. मात्र या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. भाजपचा ‘टक्का’ वाढला हे जरी खरे असले तरी ‘टोणपे’ही बऱ्यापैकी बसले आहेत. राजकारण आणि सत्ताकारण यात लपवाछपवी हा नेहमीचा खेळ असल्याने वाढलेले ‘टक्के’ सांगितले जातात आणि बसलेले ‘टोणपे’ लपवले जातात इतकेच.

टक्के आणि टोणपे

राज्यातील दहा महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालाचे कवित्व अजून काही दिवस सुरूच राहील. राज्यातील एकूणच नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एकूण जागांची गोळाबेरीज सर्वाधिक वगैरे झाली. यात अमान्य करण्यासारखे काही नाही. पुन्हा त्याचा आनंद साजरा करण्यातही काही गैर नाही. मात्र त्या पक्षाने हा जो ‘आकडा’ गाठला तो केंद्र आणि राज्यात सत्तेचा ‘मटका’ त्यांच्याकडे असल्याने हेदेखील मग मान्य व्हायला काहीच हरकत नसावी. विजय हा विजय असतो हे मान्य केले तरी तो कसा मिळाला, त्यात स्वतःचा वाटा किती आणि ‘मिसळलेला’ वाटा किती यावरूनही त्या विजयाचा रंग कोणता हे जनता ठरवीत असते. ग्रामीण अर्थकारण आणि राजकारणाचा ‘कणा’ असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रस्थापितांना दणका बसला, भाजपची संख्यात्मक वाढ झाली हे खरेच. मात्र या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत दुसरा क्रमांक शिवसेनेचाच आला आहे हे लक्षात घ्यायला हवे. विदर्भातील सहा जिल्हा परिषदांसाठी मतदान झाले. त्यापैकी चार ठिकाणी भाजपला यश मिळाले तरी यवतमाळमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आणि अमरावतीमध्ये काँग्रेसने विजय मिळविला. प. महाराष्ट्रात भाजपचे यश हे ग्रामीण भागातील ‘शिरकाव’ अशाच स्वरूपाचे आहे. सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँगेसला धक्का देत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. तथापि प. महाराष्ट्रातील इतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपले स्थान बऱ्यापैकी टिकवून ठेवले. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ तुलनेत घटले तरी सर्वात मोठा पक्ष तोच ठरला आहे आणि ६८ पैकी १७ जागा मिळविणारा भाजप सत्तेपासून बराच लांब राहिला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला जबर दणका बसला असला तरी या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये मात्र चित्र वेगळे आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. पुणे जिह्यातील पुरंदर, मुळशी, जुन्नर, खेड या तालुक्यांत शिवसेनेने चांगलीच मुसंडी मारली आहे. साताऱ्यात हेच चित्र आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद ‘त्रिशंकू’ आहे आणि तेथील सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडे आहेत. नगर जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीने भाजपला रोखले. तेथे शिवसेनेच्या जागा मात्र वाढल्या आहेत. भाजपचा ‘मिशन फोर्टी’चा रथ ‘फोर्टीन’मध्येच अडकला. मराठवाड्यातील आठ जिह्यांपैकी लातूर जिल्हा परिषदेत भाजपने यश मिळवले असले तरी उर्वरित सात जिह्यांत अधांतरी परिस्थिती आहे. बीड, धाराशीव आणि परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या जालन्यामध्ये सर्वाधिक जागा भाजपने मिळवल्या असल्या तरी शिवसेनेनेही १४ जागा मिळवत दुसरा ‘नंबर’ मिळवला आहे. भाजप तेथे बहुमतापासून दूरच आहे. नांदेडमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आणि तेथे राष्ट्रवादीसोबत ते सत्ता स्थापन करतील. बीडमधील पराभव हा फक्त ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठीच नाही तर भाजपसाठीही धक्कादायक आहे. हिंगोली, परभणी आणि धाराशीव जिह्यांत भाजपपेक्षा शिवसेनाच पुढे आहे. तिकडे कोकणात रत्नागिरी आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस तर रायगडमध्ये शेकाप-राष्ट्रवादी आघाडीला यश मिळाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत तर भाजपला भोपळाही फोडता आलेला नाही आणि इतरत्रही त्यांना एका ‘आकडी’त राहावे लागले. म्हणजेच राज्यात भाजपचा ‘टक्का’ वाढला हे जरी खरे असले तरी ‘टोणपे’ही बऱ्यापैकी बसले आहेत. राजकारण आणि सत्ताकारण यात लपवाछपवी हा नेहमीचा खेळ असल्याने वाढलेले ‘टक्के’ सांगितले जातात आणि बसलेले ‘टोणपे’ लपवले जातात इतकेच.